Saibai Bhosale Death Anniversary: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी सईबाई भोसले यांच्याबद्दल काही खास गोष्टी!
Saibai Bhosale (Photo Credits: Twitter)

आजही महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी म्हणून अबाधित आहे आणि ती कायम राहील. छत्रपतींच्या विक्रमामागे राजमाता जिजाऊ यांचा आशीर्वाद आणि पत्नी सईबाई यांची साथ होती. महाराजांचे स्फूर्तीस्थान होत्या सईबाई. सईबाई या महाराजांच्या एकूण पत्नींपैकी अतिशय निकट होत्या. निंबाळकर घराण्यातील माधोजीराव आणि रेऊबाई निंबाळकर यांची कन्या सईबाई. वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी महाराजांच्या पत्नी बनून भोसले घराण्यात आल्या. युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री, महाराणी छत्रपती सईबाई भोसले यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊया त्यांच्या बद्दलच्या काही खास गोष्टी:

# सईबाईंचा आणि शिवरायांचा विवाह पुणे येथे 16 मे 1641 साली लालमहालात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यावेळी शिवाजी महाराज अवघ्या 11 वर्षांचे होते. त्यानंतर सोबत खेळत, गप्पागोष्टी करत सईबाई आणि महाराजांच्या संसार फुलू लागला. लहानपणी लग्न झाल्यामुळे दोघांमधील नाते देखील अधिक घट्ट झाले आणि स्नेह वाढला.

# सईबाई अत्यंत देखण्या, करारी, रुबाबदार होत्या, तलवार चालविण्यात पारंगत होत्या. राजमाता जिजाऊंच्या देखील त्या अत्यंत लाडक्या होत्या.

# शिवाजी महाराज आणि सईबाई यांना तीन कन्या आणि त्यानंतर संभाजी महाराज पुत्ररत्न म्हणून लाभले.

# 14 मे 1657 मध्ये सईबाईंनी संभाजी महाराजांना जन्म दिला. संभाजी राजेंच्या जन्मानंतर त्यांना व्याधींनी ग्रासले. त्या अक्षरशः अंथरुणाला खिळल्या. कोणतेही औषध लागू पडत नव्हते. कोणतेही उपचार काम करत नव्हते.

# सईबाईंची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच होती. अखेर 5 सप्टेंबर 1659 रोजी भाद्रपद वद्य चतुर्दशी सईबाईंची प्राणज्योत मालवली.

# सईबाईंच्या निधनावेळी संभाजी राजे अवघे दोन वर्षांचे होते. इतक्या लहान वयात मातृसुखाला मुकलेल्या संभाजीराजांचा सांभाळ नंतर जिजाऊंनी केला.

बालमैत्रिण, पत्नी सोडून अर्ध्या संसारातून सोडून गेल्याने राजे हळवे झाले. त्यानंतरच्या काळात छत्रपती शिवरायांना सामर्थ्यवान पत्नीची आठवण पावलोपावली होत असे, म्हटले जाते.