Ramzan 2020 Date: जगभरातील मुस्लीम बांधव रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. इस्लाम धर्मियांच्या कॅलेंडरनुसार रमझान(Ramzan) हा नववा आणि अत्यंत पवित्र महिना समजला जातो. दिवसभर उपवास, विशेष प्रार्थना, इफ्तार पार्टी यांची रेलचेल असल्याने रमझान महिन्याबाबत मुस्लीम धर्मीयांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळते. रमझान महिना हा चंद्र दर्शनानुसार ठरतो. त्यामुळे शाबान महिन्याच्या चांद रातीवर नेमका रमझान कधी सुरू होणार हे ठरतं. भारताच्या तुलनेत सौदी अरेबियामध्ये किमान 1-2 दिवस रमझान महिना सुरू होतो. भारतामध्ये ग्रेगेरियन कॅलेंडरच्या तारखेनुसार तो अंदाजे 25 एप्रिलला सुरू होऊ शकतो. मात्र नेमकी तारीख ही चंद्रदर्शनावरच ठरेल. Coronavirus: रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच धार्मिक कार्यक्रम करावेत, अल्पसंख्यांक विकास विभागाचे आवाहन.
रमझान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर कडक उपवास ठेवतात. हा काळ स्वयंशिस्त शिकवण्याचा, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा, संयमाचा आहे. चांद्रमहिन्यामध्ये शुक्लपक्षाच्या पहिल्या, दुसर्या दिवशी चंद्र दिसला की त्या रात्रीपासून नवीन माहिना सुरू होतो.
भारतामध्ये यंदा रमझान महिना कधी सुरू होणार?
भारतातील मुसलमानांच्या शाबान महिन्यातील 29 वा दिवस हा 24 एप्रिल दिवशी आहे. जर 24 एप्रिलला चंद्र दिसला तर शनिवार, 25 एप्रिल पासून रमझान महिन्याला आणि त्यासोबतच व्रताला सुरूवात होते. जर चंद्र दिसला नाही तर रमझान उपवास 26 एप्रिल पासून सुरू होतील.
रमझानच्या महिन्यात पहाटे उठून सेहरी करण्याची प्रथा आहे. सेहरीनंतर दिवसभर अन्न-पाणी न घेता उपवास केला जातो. सूर्यास्तानंतर उपवास संपतो आणि इफ्तार सुरू होते यामध्ये प्रामुख्याने सर्वात पहिल्यांदा खजूर आणि पाणी घेतले जाते त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेतला जातो.
दरम्यान यंदा जगभरात कोरोना व्हायरसचं संकट असल्याने मुस्लिम बांधवांना सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे, सामुहिक नमाज अदा करण्याचं टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.