Navratri Kanya Pujan 2021: कन्या पूजन हे नवरात्रौत्सवादरम्यान कधीही करता येते. मात्र बहुतांश लोक हे अष्टमी किंवा नवमीच्या दिवसाला अधिक श्रेष्ठ मानतात. देवीचे रुप मानल्या जाणाऱ्या कन्यांची पूजा केल्याशिवाय नवरात्रौत्सवाची पूजा अपूर्ण राहिल्याचे मानले जाते. काही लोक उपवासाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच नवमीला कन्या पूजन करतात. परंतु लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, कन्या पूजन करताना तुमच्या हातून कोणतीही चूक होऊ नये. तर जाणून घ्या कन्या पूजनाच्या योग्य पद्धतीसह विधीबद्दल अधिक.
कन्या पूजन करताना देवी भगवतीचा आशीर्वाद मिळवू शकता. कारण यामध्ये आदि शक्तीचा वास असतो. कन्या पूजन करताना लक्षात ठेवा की, मुलींचे वय हे 2-10 वर्षादरम्यान असावे. त्याचसोबत एका लहान मुलाला सु्द्धा आमंत्रित करावे. आदि शक्तींची सेवा आणि सुरक्षिततेसाठी भगवान शंकर यांनी प्रत्येक शक्तीपीठासह एक-एक भैरव यांना सुद्धा ठेवले आहे. यासाठी देवी सोबत यांची सुद्धा पूजा करणे महत्वाचे मानले जाते.(Navratri 2021 Quotes And Messages: नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Messages, Status शेअर करत साजरा करा घटस्थापनेचा पहिला दिवस)
शास्रानुसार, मुलीचा जन्म होऊन एक वर्ष झाल्यास तिला कुमारीका म्हणून संबोधले जाते. तर ती दोन वर्षाची झाल्यास तिला कुमारी, तीन वर्षाची असल्यास त्रिमुर्ती, चारला कल्याणी, पाच वर्षाची रोहिणी, सहा वर्षाची कालिका, सात वर्षाची चंडिका, आठ वर्षाची शांभवी, नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणून मानले जाते. नवरात्रीच्या काळात एक कन्या ही एका सुप्त उर्जेचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या पूजेने ही उर्जा सक्रिय होते. तसेच त्यांची पूजा केल्याने सर्व देवींचा आशीर्वाद आणि कृपा मिळते.
नवमीच्या दिवशी कन्या पूजनापूर्वी घर स्वच्छ करुन घ्यावे. कारण घरात येणाऱ्या कन्या या देवींचे रुप मानले जाते. कन्या पूजनात 9 कन्या आणि एका बालकाची पूजा करणे फार महत्वाचे असते. मात्र हे शक्य नसेल तर कमीत कमी दोन कन्यांना भोजन जरुर द्या. कन्या पूजन करताना त्यांचे पाय दूध किंवा पाण्याने आपल्या हाताने साफ करा. कारण त्यांना देवीचे रुप त्या दिवशी प्राप्त झालेले असते. त्यानंतर त्यांना स्वच्छ ठिकाणी बसण्यास सांगावे. कन्यांना खीर-पूर, हलवा-चणे तुम्ही खाण्यास देऊ शकता. तसेच त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकत त्यांना फूल आणि हळदी-कुंकू लावा. आता त्यांना दान देताना लाल रंगाची ओढणी, फळ, रुमाल स्वरुपात भेट दिल्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. असे म्हटले जाते की, पूर्ण विधीनुसार कन्या पूजन केल्यास नवरात्रौत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्याचे फळ ही मिळते.