Diwali Celebrations With 'Killa' Making in Maharashtra: लहान मुले दिवाळीत किल्ला का बांधतात? जाणून घ्या कारण आणि पाहा कसा बांधाल किल्ला ( Watch Video )
Photo Credit : Facebook

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे.आपल्या सगळ्यांकडेच फराळ, घराची सजावट सुरु झाली असेल.दिवाळीत आपण अजून एक गोष्ट पाहतो ते म्हणजे अनेक ठिकाणी लहान मुलेएकत्र येऊन घराबाहेर किल्ला बांधतात.पण आपल्यातल्या कित्येकांना हा किल्ला का बांधला जातो? लहान मुलेच हा किल्ला का बांधतात आणि किल्ला घरबाहेरच तयार केला जातो? या बद्दल माहिती नसेल.तेव्हा आजच्या लेखातून आपण या बद्दलच माहिती घेणार आहोत.चला जाणून घेऊयात सविस्तर माहिती. ( Children's Day 2020: बालदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील खरं कारण )

किल्ला बांधण्याची सुरुवात 

येणार्‍या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यांसाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली. किल्ल्यांवर सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजवण्याचे कार्य चालू झाले.किल्ला बांधणे म्हणजे स्वत:च्या मन आणि बुद्धी यांवर ईश्वराच्या शक्तीचे तेज निर्माण होणे. म्हणूनच किल्ला बांधणे या माध्यमातून आपण ईश्वराचे तेज प्राप्त करू शकतो.

लहान मुलेच किल्ला का बांधतात

लहान मुले देवाघरची फुले असे आपण म्हणतो.लहान मुलांमध्ये निर्मळता असते. लहान मुले ही 'ईश्‍वराचे रूप असतात', असे म्हटले जाते; कारण लहान मुलांच्या मनावर जास्त संस्कार झालेले नसतात.साधारण 11-12  वर्षापर्यंतची मुले ही निरागस असतात. त्यानंतर मात्र मूल बुद्धीने एखादी कृती करतो. मुलांमध्ये ईश्वराकडून आलेली उर्जा ग्रहण करण्याची क्षमता असते.म्हणून हे कार्य लहान मुलेच करतात.

घरबाहेरच किल्ला का बांधला जातो 

घर हे मंदिरासमान मानले जाते.घर हे समृद्ध‍ि-दर्शकतेचे प्रतीक असते. घरासमोर किल्ल्याची निर्मिती केल्यामुळे घराचे रक्षण करण्यासाठी, म्हणजेच घरात असलेल्या धनसमृद्धीला टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या क्षात्रतेजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या, किल्ल्याचे नेतृत्व असलेल्या धर्माचरणी राजाशी अभेदता निर्माण करते.

यंदा तुम्हाला आपल्या मुलांना किल्ला बनवायला शिकवायचे असेल तर हा खाली दिलेला व्हिडीओ पहा.यामध्ये तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकता येऊ शकतील.

ज्यांना किल्ला बनवण्याची इच्छा आहे मात्र कसा करायचा हा प्रश्न पडलाय त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा.यातून सुरवतीपासून अगदी शेवटपर्यंत किल्ला कसा उभारावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. तेव्हा यंदा दिवाळीनिमित्त तुमच्या मुलांकडून ही छान कलाकृती नक्की करुन घ्या.