भारतात तब्बल 150 वर्ष इंग्रजांचे राज्य होते. 15 ऑगस्ट 1947 (15th August 1947) साली इंग्रजांच्या गुलामीतून देशाची सुटका झाली आणि भारत स्वतंत्र झाला. यंदा भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन आहे. दरवर्षी देशाचा स्वातंत्र्य दिन शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये यांसह अनेक रहिवाशी सोसायट्यांमध्ये अगदी उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकट असल्याने काही बंधनं साहजिकच आपल्यावर आली आहेत. त्यामुळे यंदा स्वातंत्र्य दिन व्हर्चुअली साजरा करण्यावर भर दिला जात आहे. शाळांनीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून झेंडावंदनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास सांगितले आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. यंदा ऑफिसेसही बंद असल्याने तिरंगी कपडे घालून स्वातंत्र्य दिनाचा आनंद घेता येणार नाही. तरी तुम्ही ऑनलाईन सेलिब्रेशनचा भाग होऊ शकता. तसंच तिरंगी पदार्थ बनवणे, देशभक्तीवर गाणे गाऊन यंदाचा स्वातंत्र्य दिन खास करु शकता. (स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Wishes, Greetings, Images, WhatsApp Status पाठवून साजरा करा राष्ट्रीय सण)
तिरंगी खाद्यपदार्थ:
स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची एक भन्नाट कल्पना म्हणजे तिरंगी खाद्यपदार्थ बनवणे. तुम्हाला नवेनवे पदार्थ बनवायला आवडत असेल तर तुम्ही तिरंगी खाद्यपदार्थ नक्की ट्राय करु शकता. त्यामुळे सेलिब्रेशनचा आनंद तर मिळेलच आणि तुमची आवडही जपली जाईल.
गॅलरीतून सेलिब्रेशन:
यंदाचा स्वातंत्र्य दिन घराबाहेर पडून एकत्रितपणे साजरा करता येणार नसला तरी गॅलरीतून झेंडा फडकवून तुम्ही सेलिब्रेशन नक्कीच करु शकता. सोसायटीमध्ये पूर्वीच तशी सूचना देऊन ठेवा. एक वेळ ठरवा आणि त्यावेळेस सर्वांनी आपल्या दाराबाहेर किंवा गॅलरीत येऊन झेंडा फडकवा. यामुळे कोरोना संकटातील ही एकजूट तुम्हाला नक्कीच बळ आणि आनंद देईल. मात्र यावेळेस गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्या.
घरात बसून जुन्या खेळांचा आनंद घ्या:
अॅनरॉईड प्ले स्टोअर आणि अॅप्पल स्टोरवर अनेक जुने गेम्स तुम्ही खेळू शकता. पबजी, कॉल ऑफ ड्युटी यांसारखे गेम्स नेहमीच खेळले जातात. पण स्वातंत्र्य दिनानिमित्त विट्टी दांडू, कबड्डी यांसारखे पारंपारिक भारतीय खेळ खेळा. यातून तुम्हाला वेगळाच आनंद मिळेल आणि जुन्या आठवणी ताज्या होतील.
लहान मुलांसाठी व्हर्च्युअल अॅक्टीव्हीटी:
दरवर्षी शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ते शक्य नाही. त्यामुळे घरातच मुलांना स्वातंत्र्य सैनिकांच्या रुपात तयार करा किंवा तिरंगी ड्रेस घाला.
देशभक्तीपर गाणे गा:
देशभक्तीपर गाणे गाण्यासाठी स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिनाची आवश्यकता नाही. देशभक्ती कायम मनात असतेच. पण यंदाचा स्वातंत्र्यदिन आपल्याला घरातील सदस्यांनी एकत्र येऊन देशभक्तीपर गाणे गाण्याची संधी देत आहे. त्यामुळे ती अजिबात वाया जावू देऊ नका. सर्वांनी एकत्र येत देशभक्तीपर गाणे गाऊन स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करा.
घरच्या घरी तिरंगा बनवा:
घरच्या घरी तिरंगा बनवून यंदाचा स्वातंत्र्यदिन खास करा. तुमच्या मुलांनाही तुम्ही तिरंगा बनवायला शिकवू शकता. याचे अनेक व्हिडिओजही युट्युबवर उपलब्ध आहेत.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन व्हर्च्युअली साजरा करा. या सर्व गोष्टींमुळे स्वातंत्र्य दिन 2020 नक्कीच खास होईल. तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!