Haldi Kunku Special Ukhane: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हे मराठी उखाणे नक्की मदत करतील नाव घेण्याचा गोड हट्ट पूर्ण करायला!
Makar Sankranti Haldi Kunku Special | Photo Credits: Instagram @sneha.wadkar and @annaghha

Haldi Kunku Special Marathi Ukhane:  मकर संक्रांतीनंतर (Makar Sankranti)  रथसप्तमी (Ratha Saptami)  पर्यंत महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नववर्षातील या पहिल्या सणाच्या औचित्याने सार्‍या जणी एकत्र भेटतात. एकमेकींना तिळगूळासोबतच एखादं वाण म्हणजे भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. या निमित्ताने महिलांचं जुन्या मैत्रिणींसोबत भेट होणं, घरातील सार्‍या महिला एकत्र जमणं अशा गोष्टी होतात. सवाष्ण महिलांना या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हमखास एक आग्रह होतो तो म्हणजे नाव घेण्याचा. उखाण्यामध्ये नवर्‍यांचं नाव घेण्याची ही प्रथा फार जुनी आहे. Makar Sankranti Gift Ideas: हळदी कुंकू साठी वाण म्हणून प्लास्टिकच्या वस्तूंऐवजी द्या घरगुती वापरातील 'या' महत्त्वाच्या वस्तू.  

लग्नाच्या विधींमध्ये विविध कार्यक्रमांनुसार वेगवेगळे उखाणे घेण्याची प्रथा आहे. त्यानंतर मंगळागौर, सत्यानारायण पूजा अशा विविध कार्यक्रमांमध्येही महिला अवश्य उखाणे घेतात. मग यंदा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये तुम्हांला उखाणा घेण्याचा प्रसंग आलाच तर ऐन वेळेस तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून हे काही उखाणे अवश्य लक्षात ठेवा म्हणजे तुम्हांला ती वेळ मारून नेणं अगदी सहज शक्य होईल.

मकर संक्रांत हळदी कुंकू विशेष उखाणे 

  • कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,

    … चे नाव घेते, सार्‍या जणी बसा

  • थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले

    ----- च्या जीवावर भाग्यशाली झाले

  • कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात

    ----- चे नाव घेते माझ्या मनात

  • साजुक तुपात , नाजुक चमचा ,

    .... चे नाव घेते आशिर्वाद असु दे तुमचा

  • भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता

    ----- चे नाव घेते खास तुमच्या करिता

  • गुलाबाचे फुल दिसायला ताजे,

    हळदी कुंकवा दिवशी ...चे नाव घेते, सौभाग्य माझे

मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रात जसा साजरा केला जातो तसाच तो दक्षिण भारतामध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. गुजरातमध्ये उत्तरायण म्हणून त्याचं सेलिब्रेशन होतं. यंदा रथसप्तमी 1 फेब्रुवारी दिवशी आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या मैत्रिणींना, घरातील नातेवाईकांना, जावा, नणंदांना 1 फेब्रुवारी पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रमांचे आयोजन करू शकता.