पुण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati) मंडळाने कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग टाळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी राज्यासह देश आणि एकूणच जगभरात असलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गेली पाच-सहा महिने सर्व उत्सव साधेपणाने आणि घरीच साजरे केले जात आहेत. अनेक गणपती मंडळांनीही यंदा गणेशत्सव अत्यंत साधेपणाने किंवा गर्दी टाळून सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळानेही (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Mandal) असाच निर्णय घेत यंदाचा गणेशोत्सव परंपरेनुसार भव्यदिव्य साजरा न करता साधेपणानेच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे 'यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा होणार' असल्याचे मंडळाने म्हटले आहे.
पुणे शहरात गणेशोत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्याला खास अशी वेगळी परंपराही आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवालाही ऐतिहासिक परंपरा आहे. त्यामळे यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ गणेशोत्सव कसा साजरा करणार याबाबत उत्सुकता होती. याबाबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना गोडसे यांनी सांगितले की, यंदा कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्वं आखून दिली आहेत. त्यामुळे त्याचे पालन करत यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने आणि मुख्य मंदिरात साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. तसेच भाविकांना मंदिराबाहेरुनच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय दरवर्षीप्रमाणे यंदा हार, फुले, नारळ आणि पेढे स्वीकारले जाणार नाहीत. प्रतिवर्षी हार, फुले, नारळ आणि पेढे गणपतीला अर्पण केले जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत. (हेही वाचा, पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी 151 किलोचा मोदक अर्पण)
ऑनलाई अभिषेक उपलब्ध
अशोक गोडसे यांनी माहिती देताना पुढे सांगितले की, यंदाच्या वर्षी उत्सव काळात होणारा अभिषेक, पूजा, आरती आणि गणेशयाग गुरुजी करतील. उत्सव मंडपात भाविकांच्या हस्ते होणारे अभिषेक यंदा रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान, जर भाविकांनी गोत्र आणि नाव यांची ऑनलाइन नोंदणी केील तर गुरुजीद्वारे ऑनलाईन अभिषेक सेवा उपलब्ध असेल. तसेच, गणेशोत्सव काळात साजरे होणारे कार्यक्रमही यंदा रद्द केले जातील, असे मंडळाने म्हटले आहे.