दिवाळीची धामधूम आता अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपली आहे. शहरी भागामध्ये दिवाळी धनतेरस (Dhanteras) किंवा धनत्रयोदशी (Dhanatrayodashi) पासून साजरी करण्यास सुरूवात होते. यंदा हा धनतेरसचा सण महाराष्ट्रामध्ये शनिवार, 22 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने तुम्ही तयारी करत असाल तर पहा धनतेरसचा मुहूर्त काय आहे? हिंदू धार्मिक मान्यतांनुसार धनतेरस च्या दिवशी सोनं, चांदी, तांबे, पितळ अशा धातूंची भांडी विकत घेतली जाते. अनेकजण या दिवशी वाहन खरेदी देखील करतात. इतके मोठे आर्थिक व्यवहार शुभ मुहूर्त पाहून करण्याची पद्धत आहे.
यंदा कोरोनाचं संकट दूर सारून अनेकजण पुन्हा जल्लोषात दिवाळसण साजरं करणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील यंदा सण आणि त्याचे मुहूर्त पाहून खरेदी करणार असाल तर पहा शुभ मुहूर्त काय?
धनतेरस/ धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त
महाराष्ट्रात धनतेरस 22 ऑक्टोबर दिवशी साजरी केली जाणार आहे. द्रिक पंचांग च्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर दिवशी धनतेरस पूजा मुहूर्त हा संध्याकाळी 7 वाजून 34 मिनिटं ते 8 वाजून 40 मिनिटं असा आहे. त्रयोदशी तिथीची सुरूवात 22 ऑक्टोबर दिवशी संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी होणार असून समाप्ती 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी होणार आहे. हे देखील नक्की वाचा: Dhanteras 2022 Date & Gold Purchase Muhurat Timing: धनत्रयोदशी दिवशी यंदा सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त वेळ कोणती?
धनतेरस दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुमारे 2 तासांनी सुरू होणार्या प्रदोष काळात लक्ष्मी पूजन केले जाते. हा काळ अंदाजे 2 तास 24 मिनिटं राहणार आहे. 22 ऑक्टोबर दिवशी प्रदोषकाळ संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटं ते 8 वाजून 40 मिनिटं असा असणार आहे.
धनसंपत्तीची देवता असणार्या लक्ष्मी मातेची आणि कुबेराची पूजा केली जाते. यामध्ये जर या दोघांची मूर्ती नसेल तर दोन सुपार्या ठेवून देखील प्रतिकात्मक पूजा केली जाते. त्यांच्यासमोर दिवा लावून नैवेद्याला गोडाचा पदार्थ, दूध-साखर/ खीर असे पदार्थ दाखवून पूजा केली जाते.
टीप- सद्र लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.