COVID-19 Vaccine Update: रशियाने विकसित केलेली Sputnik V लस क्लिनिकल ट्रायल्ससाठी भारतात दाखल
Sputnik V Covid-19 Vaccine (Photo Credits: Yalç?n Sonat / 123rf)

रशियाची (Russia) कोविड-19 (Covid-19) वरील संभाव्य लस (Vaccine) Sputnik V भारतात दाखल झाली आहे. आता या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या भारतात होणार आहेत. रशियाने भारतातील मोठी फार्मा कंपनी Dr Reddy's Laboratories यांच्या सोबत करार केला असून त्यांच्याद्वारे दुसऱ्या टप्प्यातील चाचणी केल्या जाणार आहेत. यासाठी स्वयंसेवकांचा शोध सध्या सुरु आहे. माध्यमांसमोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये डॉ. रेड्डीज आणि Sputnik V यांच्या लोगोसह छोटे कंटेनर एका छोट्या ट्रकमधून उतरवताना पाहायला मिळाले. दरम्यान, Sputnik V ही लस कोरोना व्हायरस वर 92% परिणामकारक असल्याची माहिती रशियाच्या Sovereign Wealth Fund यांनी बुधवारी दिली.

4 सप्टेंबर रोजी जगातील आघाडीच्या वैद्यकीय जर्नल्सपैकी एक असलेल्या लॅन्सेटने या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स संबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. त्यात ही लसीचे कोणतेही प्रतिकूल परिणाम नसून ही लस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास समक्ष असल्याचे म्हटले होते.

50 पेक्षा जास्त देशांमधून Sputnik V लसीच्या 1.2 बिलियनपेक्षा जास्त डोसेससाठी विनंत्या आल्या आहेत. आरडीआयएफच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांद्वारे भारत, ब्राझील, चीन, दक्षिण कोरिया आणि इतर देशांमध्ये जागतिक बाजारपेठेतील लस पुरवठा केला जाईल. (Covid-19 Vaccine Update: Sputnik V लस कोरोना व्हायरस वर 92% परिणामकारक; रशियाचा दावा)

या ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस डॉ. रेड्डीज आणि रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांना ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून भारतात Sputnik V लसीच्या 2-3 टप्प्यातील मानवी चाचण्या घेण्यास मान्यता मिळाली.

कोविड लसीतील उमेदवारांचा क्लिनिकल विकास वेगवान करण्यासाठी आणि योग्य लसीची बाजारपेठ तत्परता वाढविण्याकरिता सरकार कटीबद्ध असेल, असे BIRAC चे डीबीटी आणि चेअरपर्सन रेणु स्वरुप यांनी सांगितले.

गमलेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी यांनी विकसित केलेली Sputnik V लसीची नोंद रशियाने 11 ऑगस्ट रोजी केली आणि मानवी एडिनोव्हायरल वेक्टर प्लॅटफॉर्मवर आधारित कोविड-19 वरील लसीची नोंद करणारा रशिया हा पहिला देश ठरला. दरम्यान, ही लस 92% परिणामकारक असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. मात्र भारतातील चाचण्यांचा निकाल काय सांगतो, हे पाहणे गरजेचे आहे.