Raje Umaji Naik Birth Anniversary : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली, त्यातील काही वीर स्मरणात राहिले तर अनेकांनी पद्यामागून कार्य केले आणि प्राणाची आहुती दिली. असेच एक नायक म्हणजे उमाजी नाईक. तिसर्या इंग्रज-मराठा युद्धानंतर मराठ्यांच्या माघारनंतर इंग्रजांनी सर्व प्रदेश ताब्यात घेतला आणि मराठा साम्राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकले. मराठा साम्राज्य वाचवण्याच्या शेवटच्या प्रयत्नात रामोशींनी दुसऱ्या बाजीरावाला साथ दिली. त्यावेळी रामोशींची लोकसंख्या सुमारे १८,००० होती, त्यापैकी २,००० लोकसंख्या पुणे आणि सातारा भागातील होते. इतरांप्रमाणेच रामोशींच्याही नोकऱ्या गेल्या. त्यामुळे ते शेती आणि वनसंपदेवर अवलंबून राहिले. मात्र, इंग्रजांनी रामोशांवर निर्बंध लादले. यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याच्या हालचाली सुरू केल्या. सुरुवातीला साताऱ्यातील चित्तूरसिंग त्यांचा नेता झाला. त्याच्या नेतृत्वाखाली रामोशींनी काही किल्ले जिंकले. त्यांच्या पश्चात पुरंदरचे नेतृत्व उमाजी नाईक यांच्याकडे आले.
१८२०ला पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री रॉबर्टसन यांनी इंग्रज सरकारला एक अहवाल लिहून त्यात ईस्ट इंडिया कंपनीला म्हटले होते की,
"उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे" तर मॉकिनटॉस म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारताला स्वातंत्र्य लाभले असते.
कोण होते उमाजी नाईक, जाणून घ्या
उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला. उमाजीराजे रामोशी-बेरड समाजाचे होते. वडिल दादोजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी यांनी पारंपरिक रामोशी हेर कला आत्मसात केली. वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला उमाजी शिकले होते.
उमाजी नाईक यांचे कार्य, जाणून घ्या
इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात करून संपूर्ण भारतावर ताबा मिळवण्यास सुरवात केली होती. हळूहळू मराठी राज्येही ताब्यात घेतले. इ.स. १८०३ मध्ये पुण्यात गादीवर बसलेल्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांची साथ दिली आणि पुरंदरसह इतर सर्व किल्ल्यांचे वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन मर्जीतील लोकांकडे सोपवले. त्यामुळे रामोशी समाज आक्रमक झाला. दुसरीकडे जनतेवर इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले होते. अशा परिस्थितीत उमाजीराजे पेटून उठले आणि त्यांनी इंग्रजांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्य स्थापन केले आणि "माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण केला".
उमाजी आणि त्यांचे साथीदार सत्तू नाईक हे त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते. दोघांनी जमीनदारांचा खजिना लुटला, त्यामुळे उमाजी यांना अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर उमाजी अधिक सक्रिय झाले होते. पोलीस खात्याला घाबरवणाऱ्या कोतवालची उमाजी यांनी हत्या केली होती. त्या घटनेमुळे इंग्रज सरकारचे कर्मचारी संतप्त झाले होते. फेब्रुवारी 1824 मध्ये उमाजी यांनी कडक सुरक्षा असतानाही शासकीय खजिना लुटला. ऑक्टोबर 1826 मध्ये उमाजी यांनी जेजुरी येथील पोलीस ठाण्यावर हल्ला केला, पोलीस अधिकारी मारले आणि सर्व शस्त्रे व दारूगोळा लुटला.
उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज आणि इंग्रजांच्या बाजूने असलेल्या मोठ्या जहागिरदारांना लुटले आणि गरजूंना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. उमाजी राजेंचे कार्य पाहून जनतेने त्यांना साथ दिली आणि इंग्रज आणखी घाबरले. उमाजीराजेंना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिनटॉस याने तात्काळ फर्मान सोडले. इंग्रजी सैन्यने उमाजीराजेंच्या सैन्यासोबत युद्ध केले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.
उमाजींचा राज्याभिषेक २२ जुलै १८२६ साली जेजुरी येथे करण्यात आला. उमाजीराजे यांनी विभागनिहाय सैन्य प्रमुख आणि तुकड्या नेमले आणि वेगवेगळ्या भागात तैनात केल्या आणि त्यांना कामे वाटून दिली होती. सैन्यात व गुप्तहेरखात्यात सर्व जाती-धर्माचे लोक होते. उमजींची वाढती लोकप्रियता पाहता २८ ऑक्टोबर १८२६ साली उमाजीराजेंविरुद्ध इंग्रजांनी १ला जाहिरनामा प्रसिद्ध केला. पकडणाऱ्यास मोठ्या रकमेची बक्षिसे व इनाम जाहिर केले पण जनतेने इंग्रजांना मदत केली नाही.
उमाजी यांनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात सांगितले होते की, "लोकांनी इंग्रजांनी दिलेल्या नोकऱ्या सोडावे. सर्व देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी बंड पुकारावे. राजाचा आदेश मानत अनेक ठिकाणी बंड करण्यात आले. परिस्थिती पाहता इंग्रजांनी उमाजीराजेंविरुद्ध ५वा जाहिरनामा प्रसिद्ध केला. माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये रोख आणि चारशे बिघे म्हणजे 200एकर जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. त्र्यंबक चंद्रस कुलकर्णी हा फितूर झाला व याने उमाजींराजेंची सर्व माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजी यांना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले. उमाजी यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता आणि उमाजी यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी उमाजीराजे नाईक ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले. अशा महान विराला मनाचा मुजरा आणि त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन