श्री अमरनाथ यात्रा 2023 (Amarnath Yatra 2023) ची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी ही यात्रा 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 62 दिवस चालणार आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी 17 एप्रिलपासून सुरू होईल. जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा म्हणाले की, प्रवास सुरळीत आणि सुलभ व्हावा यासाठी सरकार सर्व प्रकारची व्यवस्था करत आहे. त्रासमुक्त तीर्थयात्रा व्हावी यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. राज्यात येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना उत्तम आरोग्य सेवा आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
तीर्थयात्रा सुरू होण्यापूर्वी दूरसंचार सेवा अधिक चांगल्या पद्धतीने चालवल्या जाणार आहेत. यंदा 2023 मध्ये चालणारी ही 62 दिवसांची यात्रा 1 जुलैला सुरू होऊन 31 ऑगस्टला संपेल. सिन्हा पुढे म्हणाले की, यात्रेपूर्वी सर्व संबंधित विभागांनी जागेवरच आवश्यक सेवा देण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. यावेळी येथे राहण्याची, वीज, पिण्याचे पाणी, पुरेशी सुरक्षा आदी व्यवस्था करण्यात येत आहे.
सिन्हा यांनी सांगितले की, यात्रेला दोन्ही मार्गांनी एकाच वेळी सुरुवात केली जाईल. ज्यामध्ये अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरुवात होईल. सिन्हा यांनी यात्रेवेळी संपूर्ण स्वच्छता ठेवली पाहिजे आणि येथील सर्व प्रकारच्या अस्वच्छतेची विल्हेवाट लावावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
श्री अमरनाथ जी श्राइन बोर्ड सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था देखील सुनिश्चित करेल. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून हे थेट प्रक्षेपण पाहता येईल. श्री अमरनाथ जी यात्रा अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामध्ये यात्रेची रिअल-टाइम माहिती दिली जाईल. यामध्ये हवामानासोबतच सर्व प्रकारच्या सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. (हेही वाचा: संकटाच्या काळात पैसा महत्त्वाचा की पत्नी? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती)
दरम्यान, अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ज्याच्या दर्शनासाठी दरवर्षी उन्हाळ्यात हजारो-लाखो भाविक येथे भेट देतात.