स्मृती इराणी (Photo Credits- Facebook )

शबरीमाला मंदिराच्या संवेदनशील मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अत्यंत वादग्रस्त विधान मंगळारी (२३ ऑक्टोंबर) केले. महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत बोलताना 'तुम्हाला मंदिरात पूजा करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ आपल्यला अपवित्र करण्याचाही अधीकार मिळाला आहे असा नव्हे. मासिकपाळीदरम्यान तुम्ही मंदिरात कसे काय प्रवेश करु शकता?' असा सवाल उपस्थित करत 'रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही मित्राच्या घरी घेऊन जाऊ शकता का?', असा सवालही स्मृती इराणी यांनी उपस्थीत केला. स्मृती इराणी यांच्या या विधानानंतर एकच खळबळ उडाली असून, त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, आपले वक्तव्य हे आपले व्यक्तीगत मत असल्याचा निर्वाळाही स्मृती इराणी यांनी लागलीच दिला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलणारी मी कोणीही नाही. मी एक मंत्री आहे. पण, साधी गोष्ट आहे रक्ताने माखलेला सॅनिटरी नॅपकीन घेऊन आपण मित्राच्या घरी जाल? नाही जाऊ शकत ना. मग, तुम्हाला असे वाटते परमेश्वराच्या घरी असे जाणे सन्मानजनक आहे? हाच फरक आहे. मला पूजा करण्याचा अधिकार आहे. पण, अपवित्र करण्याचा नाही. आम्हाला या फरकाचा सन्मान करण्याची आवश्यकता आहे, असे स्मृतींनी सांगितले. (हेही वाचा, २०१९मध्ये मोदींची खुर्ची जाणार, माझी भूमीका महत्त्वाची राहणार; शरद पवार यांचे भाकीत)

ब्रिटीश हाय कमीशन आणि ऑब्जर्वर रिसर्च फाऊंडेशनने संयुक्तपणे 'यंग थिंकर्स' परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात स्मृती इराणी बोलत होत्या. या कार्यक्रमात पुढे त्या म्हणाल्या, मी हिंदू धर्माला मानते आणि मी एका पारसी व्यक्तिशी लग्न केले आहे. मी हे नक्की केले आहे की, माझ्या दोन्ही मुलांनी पारसी धर्म मानावा. त्यांनी अग्यारीमध्ये जावे. अग्यारी हे पारसी धर्मियांचे प्रार्थनास्थळ मानले जाते. या वेळी स्मृती इराणींनी एक आठवणही सांगितली. त्या म्हणाल्या, मी सोबत असताना माझे पती जेव्हा अग्यारीत जात असत तेव्हा, मी कारमध्ये त्यांची वाट पाहात असे किंवा बाहेर उभी राहात असे. स्मृती यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.