
भारत सरकारने विप्रो (Wipro) कंपनीकडे असणारे 1,150 कोटी रुपयांचे शत्रू शेअर्स (Enemy Shares) लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) आणि दोन अन्य सरकारी मालकीच्या विमा कंपन्यांना विकले आहेत. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कॉर्पोरेशन असे या दोन कंपन्यांची नावे असून, त्यांनी 258.90 रुपये प्रति शेअर या दराने हे शेअर्स खरेदी केले आहेत. एलआयसीने 3.86 कोटीहून अधिक शत्रू शेअर्सची खरेदी केली आहे. ही संपत्ती केंद्रीय गृह मंत्रालयाकडे एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया अंतर्गत देखरेखीखाली ठेवण्यात आली होती.
युद्धानंतर किंवा इतर कोणत्याही कारणांनी भारत सोडून गेलेल्या लोकांची संपत्ती सरकारकडे जमा होते. 2017 मध्ये एनिमी प्रॉपर्टी कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. यानुसार विभाजन झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानात गेलेल्या नागरिकांचा भारतातील संपत्तीवर कोणताही अधिकार राहत नाही. त्यानंतर हे शत्रु शेअर देशातील तीन मोठ्या कंपन्यांनी विकत घेतले होते. या संपत्तीचा सर्वात मोठा वाटा हा, आयटी कंपनी विप्रोकडे होता. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून अशाप्रकारे शेअर्सच्या विक्रीची परवानगी देण्यात आली होती. (हेही वाचा: Paytm कडून लवकरच नवी सेवा सुरु; उपलब्ध होणार घरी बसून पैसे कमावण्याची संधी)
बीएसईने दिलेल्या माहितीनुसार या शत्रु शेअरच्या विक्रीमुळे सरकारला 1,100 कोटी रुपये मिळणार आहेत. देशात सद्यस्थितीत तीन हजार करोड रुपयांचे शत्रु शेअर आहेत. तर, 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आहेत. सरकारला मिळालेल्या या रकमेचा उपयोग देशाचा विकास आणि सामाजिक कल्याण कार्यक्रमांसाठी केला जाणार असल्याची माहिती आहे.