Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Freshers Job in IT Companies: भारतासह जगभरात नोकर कपातीमध्ये (Lay Off) मोठी वाढ झाली आहे. अशात आता अनेक आघाडीच्या आयटी कंपन्या (IT Companies) नवीन कर्मचाऱ्यांना ऑनबोर्ड करण्याची प्रक्रिया पुढे ढकलत आहेत. यामध्ये इन्फोसिस (Infosys), विप्रो (Wipro) आणि टीसीएस (TCS) जवळजवळ 10,000 फ्रेशर्सच्या भरतीला विलंब करत असल्याचे अहवाल समोर आले आहेत. निवड होऊनही इन्फोसिस, विप्रो, टीसीएस यांनी अद्याप दहा हजार फ्रेशर्सना कामावर रुजू करून घेतले नाही. याआधी एचसीएल टेक, टेक महिंद्रा इत्यादी काही प्रमुख कंपन्यांनीही ऑनबोर्डिंगला विलंब केला होता.

नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटने अलीकडेच फ्रेशर्सचा संघर्ष समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. त्याद्वारे त्यांनी कंपन्यांना ऑनबोर्डिंग प्रक्रियेची अचूक टाइमलाइन उघड करण्याची विनंती केली होती. एनआयटीइएसचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी विद्यार्थ्यांच्या कामावर रुजू होण्याच्या तारखेची वाट पाहत असताना कोणत्या तणावाचा सामना करावा लागतो यावर भर दिला.

इन्फोसिस, विप्रो आणि टीसीएस सारख्या भारतीय आयटी कंपन्या फ्रेशर्सचे ऑनबोर्डिंग पुढे ढकलत आहेत आणि त्यांनी अजूनही भरतीची तारीख जाहीर केलेली नाही. दुसरीकडे मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोच्या एकत्रित कर्मचाऱ्यांच्या संख्येत सुमारे 64,000 ने घट झाली असल्याची चिंताजनक बाबही समोर आली आहे. आर्थिक वर्षे 2024 मध्ये, इन्फोसिसने केवळ 11,900 कॅम्पस रिक्रूटची नियुक्ती केली. गेल्या वर्षी कंपनीने नियुक्त केलेल्या 50,000 फ्रेशर्सच्या तुलनेत हे प्रमाण 76% कमी आहे. (हेही वाचा: 2024 Top 10 Valuable Brands List: 2024 मधील जगातील 10 मोठ्या मौल्यवान ब्रँड्सची यादी जाहीर, ॲपल पहिल्या स्थानावर)

विप्रोने दोन वर्षांपूर्वी केलेल्या कॅम्पस जॉब ऑफर अद्याप पूर्ण केल्या नाहीत. लवकरच या ऑफर पूर्ण केल्या जातील आणि नंतर नवीन फ्रेशर्सची नियुक्ती करू, असे कंपनीने सांगितले आहे. टीम लीजच्या आयटी स्टाफिंगचे बिझनेस हेड कृष्णा विज यांनी सांगितले की, 2022 मध्ये टॉप आयटी सेवा कंपन्यांनी नियुक्त केलेल्या सुमारे 3-5% फ्रेशर्सना अद्याप कंपनीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.