सुनील जाखड़ (Photo Credits: Facebook)

दिर्घकाळापासून पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी आज राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राज्याचे माजी अध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय, विजय इंद्र सिंगला (Vijay Inder Singla) आणि प्रताप सिंह बाजवा (Pratap Singh Bajwa) यांच्याही नावाची चर्चा आहे. तर नवज्योत सिंग सिद्धूही (Navjot Singh Sidhu) विधीमंडळ नेतेपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग राजीनामा देण्यासाठी राज्यपाल सभागृहात पोहोचले, तेव्हा त्यांच्या पत्नी प्रनीत कौरही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी खुलेपणाने काँग्रेस हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, मी आज सकाळीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये गेल्या महिन्याभरात ज्या पद्धतीने आमदारांची बैठक बोलावली गेली, त्यातून हायकमांडला माझ्यावर सशंय आहे, हे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत मी पदाचा राजीनामा दिला आहे आणि आता पक्ष ज्याला हवा असेल त्याला मुख्यमंत्री बनवू शकतो. याशिवाय भविष्यातील राजकारणाचे पर्याय खुले असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहेत. हे देखील वाचा- GST Council Meeting: ऑनलाईन जेवण मागवणे होऊ शकते महाग; आता Swiggy, Zomato सारखे ई-कॉमर्स भरणार जीएसटी

महत्वाचे म्हणजे, पंजाबच्या आगामी विधानसभा निवणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली होती. राज्यात अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू असे काँग्रेसचे दोन गट तयार झाले होते. दरम्यान, अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवण्यात आला होता. हे प्रकरण इतके वाढले की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला होता.