कर्नाटक: कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियाने पेटवून दिली रुग्णवाहिका; पहा व्हिडिओ
Ambulance Torched At Karnatak (PC - Twitter)

भारतात कोरोना विषाणुने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. अशातचं कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णवाहिका (Ambulance) आग (Fire) लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये (Belgaum) घडली आहे. तसेच कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी स्थानिक रुग्णालयाच्या आयसीयूमधील डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रकारदेखील समोर आला आहे. त्यानंतर काही वेळातचं संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेला आग लावली. यासंदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, कर्नाटकमधील बेळगाव येथील बीआयएमएस रुग्णालयाबाहेर हा प्रकार घडला. या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला आग लावली. तसेच रुग्णालयावर दगडफेक केली. याशिवाय कुटुंबातील काहींनी आयसीयूमध्ये जाऊन डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (हेही वाचा - Coronavirus in India: देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 12 लाखांचा टप्पा; मागील 24 तासांत 45,720 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर)

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं असतानाचं कर्नाटकमध्ये बुधवारी 4 हजार 764 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे कर्नाटकमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 75 हजार 833 इतकी झाली आहे.