Hyundai Car Price: जर तुम्ही ह्युंदाई (Hyundai) कारचे शौकीन असाल आणि नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (Hyundai Motor India Limited) नवीन वर्षात, म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. ह्युंदाईच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या वाहनांच्या किमतीत वाढ केली जाईल. कंपनीने ही माहिती दिली आहे.कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, प्रतिकूल विनिमय दर आणि लॉजिस्टिक खर्चात वाढ यामुळे किमती वाढवणे आवश्यक झाले आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग म्हणाले की, कच्च्या मालाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे आता किरकोळ किंमती समायोजनाद्वारे या वाढीव खर्चाचा काही भाग उचलणे अनिवार्य झाले आहे. याचा स्पष्ट अर्थ कच्चा माल महाग होत आहे आणि त्यामुळे कंपन्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत.
तरुण गर्ग पुढे म्हणाले की, कंपनीने नेहमीच वाढत्या खर्चाचा भार स्वतःच उचलण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ग्राहकांवर कमीत कमी परिणाम होईल. मात्र आता गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करणे ही गरज बनली आहे. ह्युंदाईच्या सर्व वाहनांना दरवाढीचा फटका बसणार आहे. किंमत कमाल 25,000 रुपयांनी वाढू शकते. या नवीन किमती 2025 च्या सर्व मॉडेल्सना लागू होतील, म्हणजे 2025 मध्ये तुम्ही नवीन ह्युंदाई वाहन खरेदी केल्यास तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. (हेही वाचा: आता पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी ऑनलाईन सुविधा; जाणून घ्या कुठे व कशी कराल नोंदणी)
ह्युंदाईच्या वाहनांची किंमत 5.92 लाख ते 46 लाख रुपयांपर्यंत आहे. पुढील वर्षी या दरवाढीमुळे, लोक तेवढ्याच संख्येने ह्युंदाई वाहने खरेदी करतील की इतर पर्यायांकडे वळतील, हे फक्त वेळच सांगेल. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा 16 टक्क्यांनी घसरून 1,375 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 1,628 कोटी रुपये होता.