Photo Credit- X

Maharashtra Fort: गड-किल्ले आपला सांस्कृतिक वारसा आहेत. त्यांना संरक्षित करण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) नेहमी कोणती ना कोणती उपाययोजना करत असते. मात्र, तरीही काही हुल्लडबाज त्यांचे कारनामे थांबवताना दिसत नाहीत. दारू पार्टी (Alcohol) करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. जर कोणीही किल्ल्यांवर दारू पार्टी केली. तर, त्याला शिक्षा केली जाणार आहे. तसेच त्यांना 1 लाख रुपयांचा दंडदेखील ठोठवला जाणार आहे. गड- किल्ल्यांचं (Maharashtra Fort) पावित्र्य राखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ख्रिसमस आणि न्यूइयर जवळ येत असल्याने तो साजरा करण्यासाठी अनेकांचा किल्ल्यांकडे कल वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. महाराजांनी बांधलेले किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा ठिकाणी मद्यसेवन करुन गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यानंतर आता मोठी कारवाईला समोरे जावे लागेल. (Durgadi Fort Battle: तब्बल 48 वर्षांची कायदेशीर लढाई संपली; दुर्गाडी किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात, कल्याण न्यायालयाने फेटाळला Majlis-E-Mushawarat ट्रस्टचा दावा)

दारू पिणाऱ्यांवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठवला जाईल तसेच शिक्षाही केली जाईल. हा निर्णय घेताच छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारचं अभिनंदन केलं. छत्रपती संभाजीराजे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सरकारचं अभिनंदन केल आहे. याआधीही सरकारने गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलावीत यासाठी संभाजीराजे यांनी जुलै महिन्यात देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याप्रकरणी निर्णय घेतला आहे.