ST Bus: नोव्हेंबर महिना एसटी महामंडळाला (ST Bus) भरभराटीचा गेला आहे. गेल्या महिन्यात दिवाळी (Diwali) सणामुळे प्रवाशांची मोठी रेलचेल होती. त्यामुळे गेल्या महिन्यात एसटीने मोठी कमाई केली आहे. एसटीने तब्बल 941 कोटी यंदाच्या वर्षी कमावले. हे उत्पन्न यांदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न (ST Revenue) असल्याचे सांगितले जात आहे. एसटीने दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे. यामुळे सुमारे 31.36 कोटी रुपये उत्पन्न दिवसाला प्राप्त झाले. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे 26 कोटी रुपयांनी जास्त आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एसटीची चांगली कमाई होते. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात एसटीच्या तिकीटात 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. तेव्हाही एसटीची चांगली कमाई पहायला मिळाली. यंदा मात्र, भाडेवाढ करण्यात आली नव्हती. भाडेवाढ नसताना देखील विक्रमी उत्पन्न एसटीने कमावले आहे. गाव-खेड्याच्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक वाहने नसल्यास एसटीचाच आधार घेतात. काही भागात प्रवाशांची ओढ जास्त असल्याने एसटीच्या कमाईत चढ-उतार पहायला मिळतो.
एसटीचे उत्पन्न वाढले असले तरी, तिच्या खर्चाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जसे उत्पन्न वाढते तसे त्यासाठी खर्चदेखील वाढतो. गेल्या काही महिन्यात इंधनाचे दर वाढले होते, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर व एसटीच्या इतर भागांच्या दरामध्ये वाढ या खर्चाच्याबाबी दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे तोटा 11 हजार कोटीपर्यंत पोहोचला आहे.