Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून दणका; 21 जानेवारीपर्यंत करावे लागणार आत्मसमर्पण
Bilkis Bano (PC - Twitter/ANI)

Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणातील (Bilkis Bano Case) सर्व दोषींना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दणका बसला आहे. त्यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ देण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली. या सर्व दोषींना आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. दोषींच्या या याचिकेत योग्यता नसल्याचे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

दरम्यान, बिल्किस बानो प्रकरणातील दोषींनी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आत्मसमर्पण करण्याची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. ज्या दोषींनी न्यायालयाला ही विनंती केली आहे त्यात गोविंदभाई नाई, रमेश रुपाभाई चंदना आणि मितेश चिमणलाल भट यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या याचिकेत गोविंदभाई नई यांनी आजारपणाचे कारण देत आत्मसमर्पणाची वेळ चार आठवड्यांनी वाढवण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा -Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाकडून दोषींची सुटका रद्द)

गोविंदभाई नाई यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, माझे वडील 88 वर्षांचे असून ते आजारी आहेत. त्याला बेडवरून उठताही येत नाही. त्यांना प्रत्येक कामासाठी माझ्यावर अवलंबून रहावे लागते. अशा परिस्थितीत मी एकटाच माझ्या वडिलांची काळजी घेतो. शिवाय मी स्वतः म्हातारा झालो आहे. मला दम्याचा त्रास आहे. नुकतेच माझेही ऑपरेशन झाले असून, अँजिओग्राफी करावी लागली. मूळव्याधाच्या उपचारासाठी मला दुसरे ऑपरेशन करावे लागेल. माझ्या आईचे वय 75 असून तिची प्रकृतीही खराब आहे. (हेही वाचा - Wonder Woman फेम हॉलिवूड अभिनेत्री Gal Gadot हिने व्यक्त केली शाहीन बाग आंदोलनातील 'बिलकिस बानो' यांना भेटण्याची इच्छा)

तथापी, गोविंदभाई नाई यांनी म्हटलं आहे की, तो दोन मुलांचा बापही आहे. जे त्यांच्या आर्थिक आणि इतर गरजांसाठी पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहेत. सुटकेच्या काळात मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. तसेच सुटकेच्या आदेशातील अटी व शर्तींचे पालन केले आहे. त्याचवेळी रमेश रुपाभाई चंदना यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाचे कारण देत, तर मितेश चिमणलाल भट यांनी सुगीचा हंगाम असल्याचे कारण देत आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी 6 आठवड्यांची मुदत देण्याची मागणी केली आहे.