सध्या 'वंडर वूमन 1984' (Wonder Woman 1984) या हॉलिवूड चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट भारतात तसेच परदेशातही खूप पसंत केला जात आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गॅल गॅडोट (Gal Gadot) लाही चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. गॅल गॅडोटने या चित्रपटामधून आपल्या सौंदर्यासह अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. आता गॅलने सरत्या वर्षाला निरोप देताना एक खास पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. गॅल गॅडोटने आपल्या आयुष्यातील वंडर वुमनचे फोटो शेअर केले आहेत यामध्ये शाहिन बागच्या (Shaheen Bagh) आजी बिल्किस बानो (Bilkis Bano) यांचाही समावेश आहे.
हे फोटो शेअर करताना गॅलने #MyPersonalWonderWomen हा हॅशटॅग वापरला आहे. फोटो शेअर करताना गॅल गॅडोटने लिहिले आहे, ‘2020 ला निरोप. माझ्या #MyPersonalWonderWomen ला माझे प्रेम. यातील काही माझे जवळचे मित्र आहेत, कुटुंबीय आहेत. काही प्रेरणादायक स्त्रिया आहेत, ज्यांना मला जाणून घ्यायला आवडले. तसेच अशाही काही स्त्रिया आहेत ज्यांना मला भविष्यात भेटण्याची आशा आहे. एकत्रितपणे आम्ही एक उत्तम काम करू शकतो. तुम्हीही तुमच्या वंडर वुमनचे फोटो शेअर करा.’
View this post on Instagram
गॅलने एकूण 10 महिलांचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये शाहिन बाग येथे झालेल्या सीएए, एनआरसी प्रोटेस्टमध्ये भाग घेणाऱ्या 82 वर्षीय आजी बिल्किस बानो यांचा फोटो पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला. बिलकिस बानो यांच्यासोबत वंडर वूमन या चित्रपटाची दिग्दर्शक पेटी जेनकिन्स, वंडर वूमन मधील गेलची स्टंट डबल Christiaan Bettridge सह अनेक महिला आहेत. (हेही वाचा: अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सारा अली खान यांच्या सह 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींजनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!)
दरम्यान, वंडर वुमन 1984 हा चित्रपट 2017 च्या वंडर वूमनचा सिक्वेल आहे. यात ख्रिस पाइन, पेड्रो पास्कल, रॉबिन राईट आणि क्रिस्टन विग यांच्यासह गेल गॅडोट मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पेटी जेनकिन्स यांनी केले आहे.