Supreme Court | (Photo Credit: ANI)

GATE 2022 Not Postponed: अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी, GATE 2022 परीक्षेची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा स्थगितीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, GATE 2022 पुढे ढकलली जाणार नसून ती वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल.

आता GATE परीक्षा वेळापत्रकानुसार (5, 6, 12 आणि 13 फेब्रुवारी) घेतली जाईल. गेट दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत होणार आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्रे जारी करण्यात आले आहेत. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर ही परीक्षा घेत आहे. अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयातील पदवीपूर्व स्तरावरील विषयांचे ज्ञान आणि आकलन तपासण्यासाठी GATE परीक्षा घेतली जाते. (वाचा - UPSC ESE Prelims Admit Card 2022: यूपीएससी च्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेचं प्रवेशपत्र upsc.gov.in वरून असं करा डाऊनलोड!)

गेट परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी केली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने याचिकाकर्त्या उमेदवार विद्यार्थ्यांच्या वतीने वकील पल्लभ मोंगिया यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले. आज 'विशेष उल्लेख' दरम्यान तीन सदस्यीय खंडपीठासमोर वकिलाने ही याचिका केली.

याचिकेत गेट परीक्षेला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकेत असे म्हटले होते की, 200 केंद्रांवर नऊ लाख विद्यार्थी परीक्षा देतील, परंतु अधिकाऱ्यांनी परीक्षा आयोजित करण्यासाठी कोविड -19 शी संबंधित कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. या मार्गदर्शक तत्त्वांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनावश्यक वर्गीकरण होते. कायदेशीर आणि वैद्यकीयदृष्ट्या कोणता विद्यार्थी परीक्षेला बसू शकतो आणि कोणता नाही, याबाबत संभ्रम आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, लक्षणे नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्याची परवानगी आहे.