Veer Bahadur Singh Purvanchal University (संग्रहित संपादित प्रतिमा)

उत्तर प्रदेशातील जौनपूर (Jaunpur) येथील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठात (Veer Bahadur Singh Purvanchal University) परीक्षा कशा घेतल्या जातात आणि कॉपीचे मूल्यमापन कसे होते याबाबतची एक धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. येथे फार्मसीच्या प्रथम वर्षाचे चार विद्यार्थी त्यांच्या उत्तर पत्रिकेत ‘जय श्री राम’ आणि भारतीय क्रिकेटपटूंची नावे लिहून 56 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहे. ही गोष्ट उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली आहे. आता परीक्षा समितीने या प्रकरणी डॉ. आशुतोष गुप्ता आणि डॉ. विनय वर्मा या दोन शिक्षकांना दोषी घोषित केले आहे. त्यांना त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यासाठी त्यांच्याविरोधात राजभवनाकडे तक्रार पाठवण्यात आली आहे.

पूर्वांचल विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या डी.फार्मा प्रथम आणि द्वितीय सत्राच्या परीक्षेत चुकीचे मूल्यांकन आणि अचूक उत्तरे न देताही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची घटना घडली होती. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी दिव्यांशू सिंह यांनी माहिती अधिकारांतर्गत याप्रकरणी माहिती मागवली होती. 3 ऑगस्ट 2023 रोजी, दिव्यांशु सिंग यांनी डी. फार्माच्या प्रथम वर्षाच्या 18 विद्यार्थ्यांचे रोल नंबर दिले होते आणि त्यांच्या उत्तर पत्रिकेच्या प्रती मिळवल्या आणि पुनर्मूल्यांकनाची मागणी केली.

उत्तर पत्रिकेत लिहिले ‘जय श्री राम’ व क्रिकेटपटूंची नावे-

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, बार कोड क्रमांक 4149113 च्या कॉपीमध्ये विद्यार्थ्याने जय श्री राम पास याशिवाय विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आदी भारतीय खेळाडूंची नावे लिहिली होती. हा विद्यार्थी 75 पैकी 42 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. असाच प्रकार इतर उत्तर पत्रिकेतही आढळून आला. त्यानंतर दिव्यांशू यांनी राजभवनाला पत्र पाठवून एका प्राध्यापकाने पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राजभवनने या प्रकरणाची दखल घेतली आणि 21 डिसेंबर 2023 रोजी चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले. (हेही वाचा: Uttar Pradesh: आंबेडकरनगरमध्ये लग्नात अन्नातून विषबाधा, 70 जण रुग्णालयात भरती)

राजभवनच्या आदेशानंतर विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन करून प्रकरणाची चौकशी केली आणि त्यामध्ये ही तक्रार खरी ठरली. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांमध्ये 80 पैकी 50 पेक्षा जास्त गुण देण्यात आले. या उत्तर पत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले असता दोन्ही बाह्य परीक्षकांनी त्यांना शून्य गुण दिले. याप्रकरणी कुलगुरू प्रा.वंदना सिंह यांनी सांगितले की, फार्मसी इन्स्टिट्यूटचे दोन प्राध्यापक चुकीच्या मूल्यांकनात दोषी आढळले आहेत. या दोघांनाही कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.