प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

दहशतवादाशी धैर्याने लढा देणार्‍या कॉम्रेड बलविंदर सिंह (Balwinder Singh) यांची आज सकाळी पंजाबमधील (Panjab) तरनतारन येथे त्यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. बलविंदर सिंह आज सकाळी सातच्या सुमारास घरात होते. त्यावेळी काही अज्ञात लोक घरात आले आणि त्यांनी बलविंदर सिंह यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. पोलिसांनी हा हल्ला नेमकी कोणी केला, याबद्दल कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. तथापि, बलविंदर सिंह यांची सुरक्षादेखील काही दिवसांपूर्वी मागे घेण्यात आली होती. सुरक्षा मागे घेण्यास बलविंदर सिंह यांनी विरोध दर्शविला होता.

बलविंदर सिंह यांचा भाऊ रणजित सिंह यांनी हा हल्ला दहशतवादी असू शकतो, अशी शंका व्यक्त केली आहे. बलविंदर सिंह हे त्यांच्या घराजवळही शाळा चालवत होते. सुमारे एक वर्षापूर्वीदेखील अज्ञात व्यक्तींनी बलविंदर सिंह यांच्यावर हल्ला केला होता. घटनेची माहिती मिळूनदेखील पोलिस घटनास्थळी अर्धा तास उशिरा दाखल झाले. (हेही वाचा - Haryana Shocker: मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचं सांगत पतीने पत्नीला दीड वर्षांपासून शौचालयात कोंडलं; पोलिसांनी केली सुटका)

कॉम्रेड बलविंदर सिंह कोण आहेत ?

कॉम्रेड बलविंदर सिंह यांनी अनेक दहशतवादाचा सामना केला होता. त्यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपटही बनवण्यात आले होते. याशिवाय कॉम्रेड बलविंदर यांना शौर्य चक्र पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. हा दहशतवादी हल्ला असू शकतो, असा संशय सिंह यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.

पंजाबमध्ये जेव्हा दहशतवाद शिगेला पोचला होता, तेव्हा कॉम्रेड बलविंदर सिंह यांनी मोठ्या शौर्याने दहशतवाद्यांचा सामना केला. त्यांच्यावर सुमारे 20 वेळा हल्ला करण्यात आला आणि प्रत्येक वेळी बलविंदर सिंह यांनी दहशतवाद्यांना सळो की पळो करून सोडले. कॉम्रेड बलविंदर सिंह यांनी अनेक नामांकित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींनी 1993 मध्ये शौर्य चक्राने सन्मानित केले होते.