28 मार्चला राहुल गांधींच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; पटना-साहिब इथून लढणार निवडणूक
शत्रुघ्न सिन्हा (Photo Credits: IANS)

पटना: भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचे पटना इथून तिकीट कापल्यानंतर ते नाराज होते. त्यामुळे अशा वावड्या उठत आहेत की ते आरजेडी, एसपी किंवा कॉंग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात. मात्र शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अखिलेश प्रसाद सिंह यांनी दिली आहे. 28 मार्चला सकाळी 11.30 वाजता सिन्हा यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

अखिलेश सिंह यांनी माध्यमांसमोर ही घोषणा केली आहे. त्याचसोबत शत्रुघ्न यांनीदेखील राहुल गांधी यांची 'मास्टर ऑफ सिच्युएशन' म्हणून स्तुती केली होती. 28 मार्चला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा पक्षात प्रवेश करणार असून, पटना साहिबमधून ते रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. (हेही वाचा: लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संजय दत्तने केले मोठे वक्त्यव्य)

मोदी सरकार सत्तेत आल्यावर शत्रुघ्न सिन्हा हे नेहमीच मोदी यांच्याविरोधात बोलत आले आहेत. राफेल बाबतीतही त्यांनी प्रश्न उभे केले होते. म्हणून भाजपाने बिहारमधील एनडीएच्या 40 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ज्यात पटना साहिबमधून भाजपाने रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शत्रुघ सिन्हा यांनी कॉंग्रेसमध्ये सहभागी व्हायचे संकेत द्यायला सुरुवात केली होती.