संजय दत्त (Photo Credits : Instagram)

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सध्या प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. यामध्ये स्टार प्रचारक आपल्या गळाला लागण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत आहे. नुकतेच सपना चौधरी प्रकरण गाजले, त्यानंतर उर्मिला कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची बातमी आली आता अभिनेता संजय दत्तने निवडणूक लढवण्याबाबत वक्त्यव्य केले आहे.  या आगामी निवडणुकीत आपण निवडणूक लढवत नसल्याचे संजय दत्तने स्पष्ट केले आहे. याबाबत ट्वीट करत त्याने ही माहिती दिली आहे.

‘मी निवडणूक लढवणार नाही. पण माझ्या देशासोबत मी खंबीरपणे उभा राहीन आणि माझी बहीण प्रिया दत्त हिलासुद्धा साथ देईन. देशासाठी मतदान करण्याचं आवाहन मी प्रत्येकाला करतो,’ असं ट्विट त्याने केलंय. संजय दत्त उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद मतदारसंघातून सपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. त्यावर त्याने स्पष्टीकरण दिले आहे. (हेही वाचा: सपना चौधरी काँग्रेस ऐवजी भाजप मध्ये प्रवेश करणार? भाजप नेते मनोज तिवारी यांना दिली भेट)

2009 साली जेव्हा संजय दत्तने राजकारणात प्रवेश केला, तेव्हा राज्यसभा खासदार अमर सिंह यांच्या आग्रहाखातर त्याने ‘सपा’मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संजय दत्तने लखनौ येथून निवडणूक लढविण्याची घोषणा देखील केली होती. परंतु काही कारणास्तव तो निवडणूक लढवू शकला नव्हता. नंतर अमरसिंह यांनी समाजवादी पक्षाला रामराम केल्यानंतर संजय दत्तनेही पक्षाशी फारकत घेतली.संजय दत्तचे वडील सुनील दत्त काँग्रेस खासदार होते. तर बहिण प्रिया दत्तदेखील काँग्रेसकडून खासदार झाल्या आहेत.