उमा भारती यांच्या भेटीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अश्रूंचा बांध फुटला (Video)
File image of Sadhvi Pragya Thakur (Photo Credits: IANS)

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांना भाजप (BJP) ने जेव्हापासून उमेदवारी दिलेली आहे तेव्हा पासून साध्वी कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत आहेत. एक तर गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिला भाजपने उमेदवारी दिली, त्यानंतर ठाकूर यांनी शाहिद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली. याबद्दल अजूनही टीका होत असताना आता प्रज्ञा सिंह ठाकूर आणि केंद्रीय मंत्री उमा भारती (Uma Bharti) यांची भेट चर्चेचा विषय ठरत आहे. भोपाळ येथे साध्वी उमा भारती यांना भेटल्या, त्यावेळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. प्रज्ञा सिंह ठाकूर रडत असतानाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

भाजपने भोपाळ मतदार संघातून प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. मध्यप्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला होता जिथे उमा भारती यांनी 2003 साली कॉंग्रेसचे सरकार उलथवून लावले होते. आता याच ठिकाणावरून प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणूक लढवत आहेत. उमा भारती यांची भेट घेण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यावेळी उमा भारती यांनी स्वतःच्या हाताने त्यांना खाऊ घातले. तिथून निघताना साध्वी भावूक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

(हेही वाचा: साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल)

दरम्यान नुकतेच उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञा यांची स्तुती करत, त्यांना संत म्हटले होते. मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञा घेणार का असा प्रश्न उमा भारती यांना पत्रकारांनी विचारला असता, यावर बोलताना साध्वी प्रज्ञा या महान संत आहेत. त्यांच्याशी माझी तुलना करू नका. मी अगदीच सर्वसाधारण व्यक्ती आहे, असे उमा भारती म्हणाल्या होत्या.