साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, IPS Association ने केला निषेध
Sadhvi Pragya and Hemant Karkare (Photo Credits: PTI)

मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर (Pragya Thakur) यांना, भाजप पक्षाकडून लोकसभा निवडणुकांसाठी भोपाळ (Bhopal) येथून उमेदवारी देण्यात आली. मात्र एका आरोपीला उमेदवारी देण्यात आली याचा लोकांनी निषेध नोंदवला, याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या गोष्टी शांत होत आहेत तोपर्यंतच प्रज्ञा ठाकूर यांनी एका सभेमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अनेक वादग्रस्त विधाने केली, ‘मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले’, अशा आशयाची ही विधाने आहेत. मात्र आता दहशतवादी हल्ल्यातील एका शहीदाविषयी असे विधान केल्याने ठाकूर गोत्यात आल्या आहेत.

निवडणुकीच्या काळात लष्कर आणि शहीद जवानांबद्दल कोणतीही टिप्पणी करु नये, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली. तसेच आयपीएस असोसिएशन (IPS Association) नेदेखील याबाबत एक ट्वीट करून आपला निषेध नोंदवला आहे. ‘अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आयपीएस श्री. हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांशी लढा देत फार मोठे बलिदान दिले आहे. निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराने एका शहीदाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्त्यव्याचा आम्ही निषेध करतो. तसेच शहीदांनी केलेल्या त्यागाचा आदर करावा अशी अपेक्षा करतो’, असे हे ट्वीट आहे.

तिकीट मिळाल्यानंतर प्रज्ञा ठाकूर गुरूवारी पहिल्यांदा मीडियासमोर आल्या तेव्हा त्या हेमंत करकरे यांच्याबद्दल बोलल्या होत्या. ‘आपल्याला जेव्हा तुरुंगात डांबले होते तेव्हा हेमंत करकरे यांनी आपल्या विरुद्ध पुरावा मिळवणारच असे सांगितले होते. हेमंत करकरे यांनी देशद्रोह केला होता, त्यांनी मला शिवीगाळ केली होती. ज्या दिवशी दहशतवाद्यांनी करकरे यांना मारले त्या दिवशी माझे सुतक संपले.’ असे ठाकूर म्हणाल्या होत्या.