
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे रतुल पुरी यांना इनकम टॅक्स डिपार्टमेंटने अटक केली आहे. सेट्रल बँक ऑफ इंडियाकडून कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या घोटाळ्यात रतुल पुरी यांच्यासह दोघांवर खटला दाखल करण्यात आला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान २० ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार रतुल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच रतुल पुरी यांच्या नातेवाईकांच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रतुल पुरी हे मोझरबेअर कंपनीचे माजी कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी २०१२ साली कंपनीच्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांचे आई-वडील संचालक पदाचा कारभार चालवत होते. दरम्यान रतुल यांनी बॅंक ऑफ इंडियाकडून ३५४ कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्यावर फसवणूक आणि भ्रष्टाचारासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. याप्रकरणी सीबीआयच्या पथकाने सोमवारी रतुल यांच्या ६ ठिकांणावर छापे टाकले होते.
पुरी यांची कंपनी २००९ पासून निरनिराळ्या बँकांकडून कर्ज घेत होती. तसेच वेळोवेळी कर्ज भरण्याच्या अटींमध्येही कंपनी बदल करून घेत होती, असे बँकेकडून सांगण्यात आले. २० एप्रिल २०१९ रोजी एका फॉरेन्सिक ऑडिटनंतर बँकेने कंपनीचे खाते बनावट असल्याचे घोषीत केले होते. त्याचबरोबर कंपनी आणि कंपनीच्या संचालकांनी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले होते. यापूर्वी ३ हजार ६०० कोटी रूपयांच्या ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरणातही रतुल पुरीचे नाव समोर आले होते.