Rajasthan Govt Banned Firecrackers: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारचा मोठा निर्णय; फटाक्यांच्या विक्रीवर व आतषबाजीवर बंदी
मुख्यमंत्री अशोक गहलोत (Photo Credits: ANI)

Rajasthan Govt Banned Firecrackers: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीवर आणि आतषबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महासंकट काळात नागरिकांच्या जीवाचे रक्षण व्हावे, यासाठी गेहलोत यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेहलोत यांनी रविवारी संध्याकाळी राज्यातील कोरोना संसर्ग, 'नो मास्क-नो एंट्री' आणि '‘शुद्ध के लिए युद्ध' मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत अनलॉक 6 च्या मार्गदर्शक सूचनांविषयीदेखील चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोरोना संक्रमित रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी राज्यातील फटाके विक्रीवर तसेच आतषबाजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याशिवाय हवेत विषारी वायू सोडणाऱ्या जुन्या वाहनांविरूद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. कोरोना साथीच्या कठीण काळात राज्यातील जनतेचे प्राण वाचविणे हे सरकारसाठी सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट असल्याचंही गेहलोत यांनी यावेळी सांगितलं

मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले की, फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे कोरोना संक्रमित रुग्ण तसेच हृदय व श्वासोच्छवासाच्या रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकानी यंदा दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी टाळली पाहिजे. तसेच विवाहसोहळा आणि इतर समारंभातदेखील फटाक्यांची आतषबाजी थांबायला हवी. यावेळी गेहलोत यांनी फटाक्यांच्या विक्रीसाठी तात्पुरत्या परवान्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा - HAM writes to PM Narendra Modi: रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी; हिंदुस्थानी अवाम मोर्चा पक्षाचे पंतप्रधान मोदी यांना पक्ष)

कोरोना संक्रमणाची दुसरी लाट जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्पेन सारख्या विकसित देशांमध्ये सुरू झाली आहे. अनेक देशांना पुन्हा लॉकडाउन करावे लागले आहे. आपल्या देशातही अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आपणदेखील सावधगिरी बाळगली पाहिजे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केलं. राज्यातील 2000 डॉक्टरांची भरती प्रक्रिया लवकरचं पूर्ण करण्यात येईल. परीक्षेच्या निकालानंतर निवडलेल्या डॉक्टरांनी 10 दिवसांच्या आत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी आणि लवकरचं त्यांना नियुक्ती दिली जाईल. यामुळे कोरोनासह इतर रोगांवर उपचार करण्यास मदत होईल, असंही गेहलोत यांनी यावेळी सांगितलं.

'अनलॉक -6' च्या मार्गदर्शक तत्त्वावरील चर्चेदरम्यान गृहसचिव अभय कुमार म्हणाले की, 16 नोव्हेंबरपर्यंत शाळा व महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था व कोचिंग सेंटर नियमित शैक्षणिक कामांसाठी बंद राहतील. यानंतर परिस्थितीचा आढाव्या घेतल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर स्विमिंग पूल, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स, एन्टरटेन्मेंट पार्क इ. पूर्वीच्या आदेशानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. तसेच विवाह सोहळ्यातील अतिथींची कमाल मर्यादा 100 असेल, असंही अभय कुमार यांनी यावेळी स्पष्ट केलं.