सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री (Archived images)

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात (२०१९) होणारी लोकसभा निवडणूक आपण लढवणार नाही, असे सुष्मा स्वराज यांनी म्हटले आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव आपण हा निर्णय घेतला असल्याचे स्वराज यांनी मंगळवारी (२० नोव्हेंबर) इंदोर येथे सांगितले.

मध्य प्रदेशात पार पडत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारार्थ सुषमा स्वराज इंदोरला पोहोचल्या होत्या. या वेळी आयोजित एका पत्रकार परिषदेत स्वराज बोलत होत्या. अर्थात पुढचा निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. पण, सध्यातरी मी आगामी निवडणूक न लढविण्याच्या विचारात आहे, असे त्या म्हणाल्या. सुषमा स्वाराज मध्य प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर भाजपचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या विशिष्ठ वक्तृत्वशैलीसाठी सुषमा स्वराज भाजपच्या स्टार प्रचारकांमधील एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखल्या जातात. खास करुन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे. (हेही वाचा, Indira Gandhi Birth Anniversary: भारताच्या Iron Lady इंदिरा गांधींबद्दल काही खास गोष्टी!)

सुषमा स्वराज या मध्यंतरीच्या काळात प्रकृती अस्वस्थ्याने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स इस्पितळात बराच काळ उपचार सुरु होते. याच इस्पितळात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्या सोशल मीडियावर प्रचंड कार्यरत राहिल्या आहेत. अनेक गंभीर प्रश्नांची दखल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच घेतली. त्यांच्या या कार्यशैलीवर अनेकांनी टीका केली. मात्र, त्याचे कौतुकही मोठ्या प्रमाणावर झाले.