Priyanka Gandhi enters politics: राजकारणात घराण्यांचा वारसा लोकांनी स्वीकारला असेल तर त्यात इतरांच्या पोटात दुखायचे कारण काय? असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाचे स्वागत केले आहे. दरम्यान, राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे. प्रियंकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी यांचे मुक्तकंठाने स्वागत करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलेही आहे. ‘‘काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष आहे,’’ असा घराणेशाहीकडे अंगूलीनिर्देश करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशावर खोचक टिप्पणी केली होती. त्यावरुन ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला कोपरखळी मारली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये 'हुकमाची राणी' या मथळ्याळाली उद्धव ठाकरे यांनी लेख लिहिली आहे. या लेखात ठाकरे यांनी भाजपच्या नाकावर टीच्चून प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. नेहरू-इंदिरा गांधी यांच्याविषयी भाजप नेतृत्वाने मनात अढी बाळगली, कारण हेच कुटुंब भाजपास आव्हान देऊ शकते व 2019 ला निदान बहुमताचा आकडा गाठण्यात अडथळा ठरू शकते ही भीती आहेच. हे सत्य आहे. काँग्रेस पक्षाविषयी, गांधी कुटुंबाविषयी आमच्या मनात ममत्व असण्याचे कारण नाही. काँगेस पक्ष कसा चालवायचा, मायावती, अखिलेश यादव किंवा शिवसेनेने कोणत्या भूमिका कधी घ्याव्यात हे ठरविण्याचा अधिकार इतरांना नाही. प्रियंका गांधी यांना सक्रिय करावे असे काँगेसला वाटत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ का करावी? प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप आहेत व त्यांच्या वागण्या-बोलण्यात ती झलक दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक पट्टय़ात काँगेसला नक्कीच उभारी येईल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. (हेही वाचा, प्रियंका गांधी निवडणूक लढवणार का? बहिणीच्या राजकीय एण्ट्रीवर राहुल गांधी यांची दिलखुलास प्रतिक्रिया)
प्रियंका गांधी राजकारणात आल्याने रॉबर्ट वढेरांची दडपलेली प्रकरणे वेगात बाहेर येतील ही भीती असतानाही प्रियंकाने मैदानात उडी मारली. आम्ही बचावात्मक नव्हे तर आक्रमक राजकारणावर भर देणार आहोत. त्यासाठीच प्रियंकावर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राहुल गांधी यांनी लपवाछपवी न करता सांगितले. राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे. प्रियंकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.