Priyanka Gandhi enters politics: प्रियंका गांधी - वड्रा (Priyanka Gandhi vadra) यांना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका असोत किंवा सिंधिया दोन्हीही सक्षम नेते आहेत. ते काँग्रेस विचारांची लढाई लढत आहेत. काँग्रेसची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दोघेही यशस्वी होतील,असे राहुल गांधी म्हटले आहे. दरम्यान, राहुल यांनी भाजपवरही निशाणा साधत काँग्रेसच्या या निर्णयामुळे भाजप काहीशी घाबरला आहे, असे म्हटले आहे.
प्रियंका गांधी निवडणूक लढवणार काय? या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी त्यांना एक मोहीम दिली आहे. त्या काँग्रेस विचारधारेला पुढे घेऊन जातील. गरीब आणि दीनदुबळ्यांना मदत करण्यासाठी काँग्रेसची विचारधारा त्या पुढे घेऊन जातील. उत्तर प्रदेशच्या तरुणांईला पुढे आणण्यात त्यांचा मोठा वाटा असेल. माझी बहीण सक्षम आहे आणि कर्मठही आहे. याचा मला आनंद आहे. निवडणूक लढविण्याचा निर्णय ती स्वत: घेईन. (हेही वाचा, राहुल गांधी यांचा मोठा निर्णय; प्रियंका यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी)
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या सपा-बसपा आघाडीवरही राहुल यांनी या वेळी भाष्य केले. ते म्हणाले, आमची लढाई सपा-बसपासोबत नाहीच मुळी. आम्ही तिघेजण मिळून भाजपला पराभूत करु. महत्त्वाचे असे की, सपा-बसापा आघाडीचे जागावाटप झाले असून, दोघेही 38-38 जागांवर लढणार आहेत. तर दोन जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडणार आहेत. उर्वरीत दोन जागांवर ही आघाडीने वॉकओव्हर करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेटी आणि रायबरेली अशा या दोन जागा आहेत. दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस सर्वच्या सर्व 80 जागांवर लढणार आहे.