
शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या महाराष्ट्र (Maharashtra) पिंजून काढताना दिसत आहेत. काल आदित्य यांनी बंडखोर आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. तसेच रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या रॅलीत शिवसैनिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. आदित्य ठाकरे यांच्या सभेला कशी गर्दी झाली याबाबत एका शिवसैनिकांने बंडखोर आमदार भुमरे यांना फोन करुन सविस्तर माहिती दिली. पण माहिती देणाऱ्या या शिवसैनिकावर भुमरे चांगलेचं भडकले. याबाबत भुमरे आणि एका शिवसैनिकाची संभाषणाची ऑडिओ क्लिप (Audio Clip) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
योगेश क्षीरसागर (Yogesh Shirsagar) या शिवसैनिकानं माजी मंत्री संदिपान भुमरे यांना फोन केला. क्षीरसागर यानं संदिपान भुमरेंना तुमच्या पैठण (Paithan) मतदारसंघात आदित्य ठाकरेंची रॅली निघाली, तुम्हाला मतदान करणारे लोक त्यांच्यासोबत जातील असं योगेश क्षीरसागर यांनी भुमरे यांना सांगितलं. संदिपान भुमरे यांनी त्या शिवसैनिकाला चांगलचं सुनावलं. आदित्य ठाकरेंची रॅली निघाली, त्याला गर्दी झाली आपण देखील रॅली काढूया असं सांगितलं. भुमरे यांनी त्या शिवसैनिकाला भेटायला बोलावलं. यावर कार्यकर्ता मी कधी भेटायला येवू, असं विचारतो. त्यामुळं संदिपान भुमरे यांनी आपण देखील रॅली काढू असं म्हटलं आहे. संबंधित शिवसैनिकानं संदिपान भुमरे यांना भेटायला येण्याचं मान्य केलं आणि फोनवरील संभाषण संपवलं.
राज्यात सरकार स्थापन होवून आज जवळजवळ 24 दिवस झालेत पण सत्तासंघर्षासह प्रतिष्ठेची लढाई संपण्याचं काही चिन्ह नाही. सत्ताधारी विरुध्द विरोधक नाही तर शिवसेना (Shiv Sena) विरुध्द शिवसेना हा सामना सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) रंगला आहे. कुठली शिवसेना खरी आणि कुठली शिवसेना खोटी ही प्रतिष्ठेची लढाई राज्यात बघायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर शिंदे गटातून रोज वेगवेगळ्या प्रतिक्रीया येताना दिसतात. आदित्य यांच्या पैठणच्या दौऱ्यानंतर भुमरे आणि एका शिवसैनिकाची संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपची खात्री लेटेस्टली मराठी (Latestly Marathi) करत नाही.