Modi Cabinet 2019: मोदी सरकार मध्ये रावसाहेब दानवे, प्रताप चिखलीकर, गोपाल शेट्टी या नव्या चेहर्‍यांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपदाची संधी?
Maharashtra BJP MP (File Photo)

लोकसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता महाराष्ट्रासह देशातील मतदारांचं लक्ष नव्या मोदी सरकारच्या शपथसोहळ्याकडे लागले आहे. येत्या 30 मे दिवशी संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी(Narendra Modi) पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यासोबतच कॅबिनेट मंत्रिमंडळातील खासदारांचादेखील शपथ सोहळा पार पडणार आहे.Maharashtra Lok Sabha Elections Results 2019: लोकसभा निवडणूक निकाल 2019 चे महाराष्ट्रातील 48 विजयी खासदार; पहा संपूर्ण यादी

महाराष्ट्रामध्ये यंदा 48 लोकसभा जागांवर निवडणूक पार पडली त्यामध्ये शिवसेना भाजपा पक्षाची 23 -25 जागांवर फॉर्म्युला फिक्स झाला होता. त्यानुसार शिवसेनेने 18 तर भाजपाने यंदा महाराष्ट्रात 23 जागांवर विजय मिळवला आहे. त्यापैकी आता प्रताप चिखलीकर, गोपाल शेट्टी आणि रावसाहेब दानवे या भाजपा खासदारांच्या गळ्यात यंदा कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भाजपाच्या निवडून आलेल्या खासदारांपैकी नितिन गडकरी यांचं मंत्रिपद कायम राहिल. मात्र त्यासोबतच रावसाहेब दानवे या भाजपाच्या पूर्व प्रदेशाध्यक्षांवर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

प्रताप चिखलीकर

मोदी लाटेतही 2014 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला महाराष्ट्रामध्ये एक जागा मिळवून दिली होती. मात्र यंदा त्यांचा पराभव प्रताप चिखलीकरांनी केला आहे. चिखलीकरांच्या या यशाच्या मोबदल्यात त्यांना मंत्रीपद मिळू शकतं.

गोपाल शेट्टी

कॉंग्रेसमधून उत्तर मुंबईत भाजपाच्या गोपाल शेट्टींविरोधात उभी असलेली बॉलिवूडची रंगिला गर्ल उर्मिला मातोंडकर हीचा पराभव गोपाल शेट्टींनी केला आहे. मुंबईमध्ये भाजापाला दणदणीत विजय मिळवून देणार्‍या या खासदाराला मोदी सरकारमध्ये यंदा स्थान मिळू शकतं.

यंदा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळासाठी महाराष्ट्रातून शिवसेनेच्या 3 तर भाजपाच्या 5 खासदारांना मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. त्यामुळे यंदा कोणा कोणाच्या गळ्यात ही मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.