कर्नाटकमधील (Karnatak) बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कर्नाटकातील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही ट्वीट करुन या घटनेचा निषेध केलाय. ‘देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच’, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.
Tweet
ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जी यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच !@BSBommai #ChhatrapatiShivajiMaharaj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2021
कर्नाटकचे बोम्मई यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, "शुक्रवारी रात्री बंगळुरु येथे घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. अशा लहान सहान गोष्टीवरून दगडफेक करणे, सरकारी वाहनांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही प्रवृत्ती चांगली नव्हे. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत गृहमंत्र्यांना सांगितले आहे. पुतळ्याची विटंबना करणे हे देशभक्तांचे काम नव्हे. महापुरुषांचे पुतळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उभारलेले असतात." बोम्माई यांच्या या विधानावरुन शिवसेनेकडून निषेध व्यक्त केला जात आहे तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध बेळगाव, कोल्हापूर आणि सीमाभागातून केला जात आहे. तसेच मुंबईतील भाजप कार्यालयावर मोर्चा काढत शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: यामध्ये लक्ष घालावे अन् दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विटंबना करणाऱ्या हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा, आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.