दिल्लीत आज राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची महत्वाची बैठक
राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी (संग्रहित, संपादित, प्रतिकात्मक प्रतिमा)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या बैठका होत आहेत. सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता होती पण तसे झाले नाही. तर आज पुन्हा दिल्लीत राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत सांगण्यात येणार आहे.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दिल्लीतील आजच्या बैठकीला राष्ट्रवादीचे जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, नबाब मलिक आणि अन्य नेते मंडळी सुद्धा उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजची ही बैठक महत्वपूर्ण असून राज्यातील पक्षाची पुढची रणनिती काय असेल हे सुद्धा ठरवण्यात येणार आहे. तसेच आजच्या बैठकीत सत्ता कोंडीबाबतच्या मुद्द्यावरुन काय निर्णय होईल हे सुद्धा पहाणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसचे नेते मंडळी सुद्धा बैठकीला उपस्थितीत राहणार आहेत.(दिल्ली: सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? सरकार स्थापन होणार की नाही? काय म्हणाले शरद पवार?)

सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीत राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्तापनेचा मुहूर्त मात्र लांबणीवर पडल्याचे पुन्हा एकदा समोर आले. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना-भाजप यांच्यातील सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्रात सरकारस्थापनेबाबत निर्माण झालेला पेच सुटला नाही. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी नवी आघाडी आकाराला आणत सरकार बनविण्याबाबत प्रयत्न सुरु झाले.