खासदार सावित्री फुले यांनी दिला भाजपचा राजीनामा | (Photo Courtesy: Archived, Edited, Symbolic Images)

Dalit MP Savitri Phule Quits BJP: वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजप (BJP)महिला खासदार सावित्री फुले (MP Savitri Phule  ) यांनी भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) सोडचिठ्ठी दिली आहे. त्या उत्तर प्रदेशमधील बहराइच लोकसभा मतदारसंघातून (Bahraich Lok Sabha constituency ) लोकसभेवर भाजपचे प्रतिनिधित्त्व करत होत्या. भाजपमधून बाहेर पडताना फुले यांनी पुन्हा एकदा भाजप आणि नेतृत्त्वावर तीव्र शब्दात टीका केली. भारतीय जनता पक्ष समाजात फूट पाडण्यासाठी कट रचत आहे. त्यामुळे आपण भाजपमधून बाहेर पडत आहोत. हा पक्ष दलित विरोधी (Anti-Dalit)आहे. आपण दलित असल्यामुळेच पक्षाने आपल्याला डावलले असा आरोपही फुले यांनी केला. दरम्यान, यानंतर आयुष्यात कधीच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, अशी शपथ घेतल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी, आपण खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करु असेही त्या म्हणाल्या.

लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावित्री फुले यांनी राजीनाम्याची घोषणा केली. या वेळी त्यांनी भाजपसह आरएसएसवरही जोरदार टीका केली. भाजप हा दलित विरोधी पक्ष आहे. हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची अवहेलना करण्यात आली. भाजपचे अनेक नेते जाहीरपणे संविधान बदलण्याची भाषा करतात. तसेच, सत्तेत येण्यापूर्वी या पक्षाने खासगी क्षेत्रात एससी-एसटी वर्गासाठी आरक्षण लागू करण्याचे दिलेले आश्वासनही पूर्ण केले नाही, असे खा. फुले म्हणाल्या.

दरम्यान, केंद्र सरकारवर टीका करताना खा. फुले म्हणाल्या, सरकारने विदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचेही अश्वासन पूर्ण केले नाही. केवळ मंदिर, मशिदीच्या मुद्दयावरुन समाजात भीती निर्माण केली जात आहे. आपण केवळ दलित आहोत म्हणूनच आपल्याला डावलण्यात आल्याचा पुनरुच्चाहरी फुले यांनी केला. (हेही वाचा, छप्पन इंचवाल्यांच्या हाती कारभाराच्या किल्ल्या सोपवल्या तरीही, अयोध्येत राम मंदीर नाही: शिवसेना)

काही दिवसांपूर्वी खासदार सावित्री फुले यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली होती. ज्यामुळे भाजपही अडचणीत आला होता. राम मंदिर म्हणजे देशातील तीन टक्के ब्राह्मणांच्या कमाईचा धंदा असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. तसेच, भगवान राम हे शक्तिहीन असल्याचेही विधान त्यांनी केले होते. जर भगवान राम यांच्यात शक्ती असती तर, अयोध्येत राम मंदिर केव्हाच झाले असते, असे त्या म्हणाल्या होत्या. दुसऱ्या एका विधानत त्यांनी भगवान हनुमान हे मनूवादी लोकांचे गुलाम होते असे विधान केले होते. त्यांनी भगवान राम हेसुद्धा मनुवादी असल्याचेही त्यांनी विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे भाजपवर टीका झाली होती.