राजस्थानचे पायलट अशोक गेहलोत: सूत्र
United Colors of Rajasthan | Photo courtesy. Twitter, Rahul Gandhi

राजस्थानचे पुढचे मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाल्यात जमा आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या नावावर राजस्थानचे मुख्यमंत्री (Chief Minister of Rajasthan) म्हणून शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार, १४ डिसेंबर) दुपारी केलेले ट्विट तसेच, एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीमुळे या वृत्ताला बळकटी मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज दुपारी ट्विटरद्वारे एक छायाचित्र शेअर केले आहे. यात राहुल गांधी यांच्या डाव्या बाजूला सचिन पायलट (Sachin Pilot)तर, उजव्या बाजूला अशोक गेहलोत दिसतात. गेहलोत आणि पायलट यांच्या हसऱ्या भावमुद्रेतील या छायाचित्राखाली राहुल यांनी 'यूनाइटेड कलर्स ऑफ राजस्थान' अशी कॅप्शनही लिहीली आहे.

दरम्यान, एएनआयने आपल्या वृत्तात काँग्रेसच्या गोटातून अशोक गेहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, काँग्रेस अथवा कोणत्याही ज्येष्ठ नेत्याकडून राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, पायलट आणि गेहलोत यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन जोरदार स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. सूत्रांची माहिती अशी की, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अशोक गेहलोत दोघेही मुख्यमंत्री पदावरच्या दाव्यावर ठाम असून, माघार घ्यायला कोणीच तयार नसल्याचे समजते.

.

दरम्यान, गुरुवारी रात्री सचिन पायलट आणि अशोक गेहलोत असे दोन्ही नेते स्वतंत्रपणे राहुल गांधी यांनी भेटले. तसेच, शुक्रवारी पुन्हा एकदा सचिन पायलट, अशोक गेहलोत आणि राहुल गांधी यांच्यात पुन्हा एकदा संयुक्त बैठक झाली. मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही काँग्रेस एक असल्याचा संदेश जावा यासाठी राहुल गांधी एकत्र आहेत. मात्र, राजस्थानमध्ये राहुल गांधींचे हे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही.