पेट्रोल पंप प्रातिनिधीक प्रतिमा Petrol Pump (Photo credit: IANS)

दरवाढीचे दररोज नवनवे विक्रम करणाऱ्या पेट्रोल,डिझेलमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही प्रमाणात दिलासा दिला. अरुण जेटली यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात सरकार अडीच रुपयांची कपात करतअसल्याची घोषणा गुरुवारी (४ ऑक्टोबर) केली. जेटली म्हणाले, सर्वसामान्यांना महागाई आणि पेट्रोल,डिझेलच्या दरांमुळे काहीसा दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. त्यासाठी रेव्हेन्यू डिपार्टमेंट ३ भागात विभागले जाईल. एक्साईज ड्यूटी १.५ रुपयांनी कमी करण्यात येईल. ऑईल मार्केटींग कंपनी (ओएमसी) एक रुपया कमी करतील. तर, केंद्र सरकारकडून प्रति लीटर तत्काळ कमी करेन.

दरम्यान, जेटली यांनी राज्य सरकारांनाही आवाहन केले आहे की त्यांनीही पेट्रोल, डिझेलच्या दरात काहीशी कपात करावी. जेणेकरुन सर्वसामान्य जनतेला पेट्रोल-डिझेल दरात ५ रुपयांची सूट मिळेल. दिल्ली येथे पत्रकार परिषदेत जेटली यांनी ही घोषणा केली.

जेटली म्हणाले, अमेरिकेने व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे त्याचा बाजारावर मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. बाजार आणि शेअर मार्केटमध्येही यामुळे चढउतार जाणवत आहे. दरम्यान, महागाई पूर्णपणे नियंत्रात असून, तिचा दर ४ टक्क्यांहून कमी प्रमाणात आहे. गेल्या तिमाहीत जीडीपी ८.२ टक्क्यांनी वाढत आहे.

अरुन जेटली यांनी तेल सचिवांसोबत चर्चा झाल्याचेही सांगितले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत सरकार गंभीर आहे. तसेच, या दरवाढीचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे दर नियंत्रित राहतील याकडेही सरकारचे लक्ष असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे. दरम्यान, सूत्रांची माहिती अशी की, बुधवारी संध्याकाळी अरुण जेटली यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली आहे.