
नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात राजकीय वर्तुळातील एक नेता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल (Hardik Patel) या महिन्यात बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त आहे. खूप वर्षांपासूनची आपली मैत्रीण आणि प्रेयसी 23 वर्षीय किंजल पटेल (Kinjal Patel) हिच्यासोबत हार्दिक लग्न करणार आहे. येत्या 26 आणि 27 तारखेला हा विवाहसोहळा पार पडेल. वडील भारत पटेल आणि खास मित्र निखिल सावनी यांनी त्याच्या लग्नाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. 26 तारखेला काही घरगुती कार्यक्रम होतील, त्यानंतर 27 तारखेला हा विवाहसोहळा पार पडेल.
हार्दिक 25 वर्षांचा असून किंजल ही त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. किंजलही पटेल, पाटीदार समाजातील आहे, हे दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. अहमदाबादच्या चंदन नगरी या गावात हे दोघे राहतात. हार्दिकच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिकचा विवाहसोहळा ऊंझा येथे असणाऱ्या उमिया धाम येथे पार पडावा अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. पण, न्यायालयाने ऊंझा येथे हार्दिकच्या प्रवेशास बंदी घातल्यामुळे आता हा विवाहसोहळा सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिगसार या गावात पार पडणार आहे. या लग्नासाठी फक्त 100 लोकांनाच निमंत्रित केले जाणार आहे. (हेही वाचा : प्रतिक बब्बर अडकणार लग्नबंधनात; पाहा कोण आहे राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची होणारी सून)
किंजल ही वाणिज्य शाखेची पदवीधारक असून सध्या ती गांधीनगर येथे वकिलीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान 2015 साली पटेल समाजाला आरक्षण (Patidar reservation agitation) मिळावे यासाठी हार्दीक पटेल याने गुजरातमध्ये मोठे आंदोलन उभारले होते. त्यावेळी त्याला जेलमध्येही जावे लागले होते. त्यानंतर तो देशभर प्रसिद्ध झाला होता.