Cyclone Sitrang: सितरंग चक्रीवादळामुळे (Cyclone Sitrang) आसाममधील (Assam) परिस्थिती चिंताजनक आहे. येथे सुमारे 83 गावांतील 1100 हून अधिक लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आतापर्यंत 1146 लोक प्रभावित झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे सुमारे 325.501 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री आलेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील नागाव जिल्ह्यातील विविध भागात अनेक झाडे आणि विजेचे खांबही उन्मळून पडले. वृत्तानुसार, वादळामुळे मध्य आसाम जिल्ह्यातील कालियाबोर, बामुनी, सकमुथिया टी गार्डन आणि बोरलीगाव भागात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. (हेही वाचा -
चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर उध्वस्त होत असताना दिलासा देणारे वृत्त म्हणजे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बाधित गावाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे या भागात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कालियाबोर परिसरात अनेक घरांचे नुकसान झाले असून अनेक झाडे उन्मळून पडल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सितरंग चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या 24 परगणामधील बक्खली समुद्रकिनाऱ्यावर भरतीची लाट आली आहे. नागरी संरक्षण कर्मचार्यांनी पर्यटक आणि स्थानिकांना समुद्रापासून दूर राहण्यास सांगितले आहे, तसेच परिसरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, 'सितरंग' चक्रीवादळ पश्चिम बंगालचा किनारा ओलांडून बरिसालजवळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकला. त्यामुळे चक्रीवादळ सीतारंग भारतात काहीसे कमकुवत झाले असले तरी अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.