Ola-Uber Cab Rate : इंधन दरवाढीमुळे ओला, उबेरनं वाढवलं भाडं, जाणून घ्या नवे दर
Mumbai Ola-Uber strike (Archived images)

3 मेपासून इंधनाच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. यामुळे सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. आता या कोरोना काळात याच सामान्याला अजून एक फटका बसला आहे. मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर आधारित उबेर आणि ओला यांनीही त्यांच्या भाड्यात 15% वाढ केली आहे. चालकांच्या मागणीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.  इंधन दराच्या वाढीमुळे दोन्ही कंपन्यांनी भाडेवाढ भारतातील वेगवेगळ्या राज्यात केली आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा बंद असल्याने सामान्यांची पायपीट होतच आहे. मात्र आता या निर्णयाने त्यांच्या खिशाला अजून फटका बसला आहे.

दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंधनाच्या दरात सातत्याने वाढ केल्याने त्यांच्या चालकांनी वाढीची मागणी केली होती. भारतात मुंबईमध्ये सर्वात जास्त इंधन दर आहे. पेट्रोलची किंमत 107.20 रुपये तर डिझेल  97.29 रुपयांना मिळत आहे.  कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) मध्येही दरवाढ झाली आहे.  यामुळे कंपनीला तोटा निर्माण होत आहे.

“देशभरात इंधनाच्या किंमती वाढत असतानाच मे महिन्यामध्ये वाहन चालकांकडून भाडे वाढविण्याची मागणी सुरू झाली होती. यावरून इंधन दराच्या वाढीचा अभ्यास केला गेला.  त्यानंतरच भाडे वाढविण्याचा विचार करण्यात आला. अशी माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र हे स्पष्टीकरण देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांची नावे गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे. तसेच मुंबईतील भाडेवाढ आणि नवीन भाडे यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

भाडेवाढ झाल्याने प्रवाशांनी तक्रारी करण्यास सुरूवात केली आहे. याविरोधात मुंबईतील अनेक रहिवाशांनी कंपनीकडे तक्रार करत भाडेवाढीबाबत प्रश्न ऊभे केले आहेत. या भाडेवाढीनंतर प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकल सेवा बंद असल्या कारणाने मुंबईतील सामान्यांना ओला आणि उबेरने प्रवास करावा लागत आहे. मात्र ही भाडेवाड अत्यंत कमी आहे. याचा फायदा चालकांना होणार नाही असेही काही चालकांचे म्हणणे आहे. म्हणजेच कंपनीने केलेल्या या दरवाढीवर चालक अजूनही असंतुष्टच आहेत. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तसेच अशा प्रकारची दरवाढ पुन्हा होईल का हा प्रश्न यातून निर्माण होतो.