PM Narendra Modi (PC - ANI)

States Foundation Day Celebration: आता देशातील सर्व राज्ये एकमेकांचा स्थापना दिवस साजरा (Foundation Day Celebration) करणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या अंतर्गत आता सर्व राज्ये केवळ आपला स्थापना दिवसच नव्हे तर इतर राज्यांचा स्थापना दिवसही साजरा करतील. 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आता देशातील सर्व राजभवनांमध्ये सर्व राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे.

उद्या महाराष्ट्र-गुजरात स्थापना दिवस सर्व राज्यांमध्ये साजरा केला जाणार आहे. माहितीनुसार, या निर्णयानुसार 1 मे रोजी देशभरातील राजभवनांमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातचा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. वीस राज्ये आणि सर्व आठ केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या राजभवन (राज्यपालांचे निवासस्थान) आणि राज निवास (लेफ्टनंट गव्हर्नरचे निवासस्थान) येथे गुजरात आणि महाराष्ट्राच्या स्थापना दिनाच्या उत्सवाची पुष्टी केली आहे. यामध्ये 30 राजभवनांचा समावेश आहे. (हेही वाचा -PM Modi Reacts On 'Poisonous Snake' Remark: कॉंग्रेसच्या टीकेला नरेंद्र मोदी यांचे प्रत्युत्तर; ... तर मी साप व्हायला देखील तयार!)

गुजरात आणि महाराष्ट्रातील रहिवाशांना इतर राज्यांसह स्थापना दिन साजरा करण्यासाठी राजभवनात आमंत्रित करण्यात आले आहे. याअंतर्गत सोमवारी जवळपास सर्वच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2015 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उपक्रमाची घोषणा केली होती.

'एक भारत श्रेष्ठ भारत' या उपक्रमाचा उद्देश विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील समज वाढवणे आणि त्यांच्या संस्कृती, परंपरा आणि पद्धतींचे ज्ञान वाढवणे आणि भारताची एकता आणि अखंडता मजबूत करणे हा आहे.