PM Modi 15th August Speech 2023: पुढच्या वर्षी मी अधिक आत्मविश्वासाने लाल किल्ल्यावर येईन; पंतप्रधान मोदींचा भविष्यवेधी दावा
PM Modi (PC - ANI)

PM Modi 15th August Speech 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगळवारी स्वातंत्र्यदिनी देशवासियांना संबोधित केले. पुढच्या वेळी अधिक आत्मविश्वासाने या लाल किल्ल्यावर येईन, असा भविष्यवेधी आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. 2014 साली मी परिवर्तनाचे वचन घेऊन आलो होतो. देशातील 140 कोटी जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म या आश्वासनाचे विश्वासात रुपांतर झाले आहे. या वचनाचे मी विश्वासात रूपांतर केले आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

या वचनाचे विश्वासात रूपांतर करण्यासाठी मी कठोर परिश्रम घेतले. फक्त राष्ट्रालाच महत्त्व दिले आहे. 2019 मधील कामगिरीच्या जोरावर तुम्ही सर्वांनी मला पुन्हा संधी दिली आहे. आगामी पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची असल्याचेही यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी येणारी पाच वर्षे हा सर्वात मोठा सुवर्ण क्षण आहे. (हेही वाचा -PM Modi Independence Day 2023 Speech: भारत देश 100व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यापर्यंत विकसित देश झालेला असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी)

पीएम मोदी पुढे म्हणाले की, पुढच्या वेळी 15 ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाचे यश, तुमची क्षमता, प्रगती आणि त्यातले यश आणखी आत्मविश्वासाने तुमच्यासमोर मांडेन.

आज देशभरात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र सुरक्षा दल तैनात आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून 10 व्यांदा देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी कुटुंबवाद, तुष्टीकरण आणि भ्रष्टाचारावर त्यांनी प्रहार केला.