Zelenskyy Tea: आसामच्या कंपनीने सादर केला 'झेलेन्स्की' चहाचा ब्रँड; युक्रेनच्या अध्यक्षांच्या शौर्याचा आणि धैर्याचा गौरव
Zelenskyy Tea (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय लोकांना चहा (Tea) आवडतो, हे जगजाहीर आहे. इथल्या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात कडक चहाच्या कपाने होते. इथले लोक चहाचे इतके वेडे आहेत की त्याच्याशी तडजोड होऊच शकत नाही. सध्या ग्रीन टी आणि फ्लेवर्ड कॉफीची लोकप्रियताही देशात सातत्याने वाढत आहे. सध्या सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युद्धानंतर आसामची एक चहा कंपनी चर्चेत आली आहे. या कंपनीने आपल्या चहाचे नाव युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्या नावावर ठेवले आहे.

रशियन आक्रमणाविरुद्धच्या झेलेन्स्की यांच्या शौर्याचा आणि धैर्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या नावाने चहा सुरू केल्याचे कंपनीने म्हटले आहे. अरोमिका चहाचे संचालक रणजीत बरुआ यांनी सांगितले की, आसाम सीटीसी चहाचा ब्रँड 'झेलेन्स्की' बुधवारी बाजारात सादर करण्यात आला. या नावामागची मूळ कल्पना मांडताना ते म्हणाले, ‘या युद्धामध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोठे साहस दाखवले. त्यांनी युद्धग्रस्त देशातून बाहेर पडण्याची अमेरिकेची ऑफर नाकारली, आणि आपल्या नागरिकांसाठी उभे राहिले. त्यांच्या याच शौर्याचा गौरव करण्यासाठी आम्ही आमच्या चहाला त्यांचे नाव दिले आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘आसामचा चहा त्याची आल्हाददायक चव आणि कडकपणासाठी ओळखला जातो. युक्रेनचे राष्ट्रपती ज्याप्रकारे संकटाचा सामना करत आहेत, ते पाहून चहाला त्यांचे नाव देणे अधिक योग्य वाटले.’ या चहाचा 200 ग्रॅमचा पॅक 90 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. हा चहा कंपनीच्या विद्यमान कॅटलॉगमधील परवडणाऱ्या पर्यायांपैकी एक आहे. त्यांच्या पेटंट केलेल्या 'भूत जोलोकिया' चहासह 40 हून अधिक प्रकारचे मूल्यवर्धित चहा त्यांच्याकडे आहेत. (हेही वाचा: Russia-Ukraine War: रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये 6.5 दशलक्ष लोक विस्थापित; 3.2 दशलक्ष लोकांनी सोडला देश)

हा चहा लवकरच ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असेल. दरम्यान, चहा मंडळाच्या आकडेवारीनुसार भारतीय चहाचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या रशियाने 2021 मध्ये 30.49 दशलक्ष किलो चहा विकत घेतला होता. दुसरीकडे, युक्रेनने याच वर्षात भारतातून 17.3 लाख किलो चहा आयात केला होता.