Gaurav Taneja (संग्रहित संपादित प्रतिमा)

फ्लाइंग बीस्ट (Flying Beast) म्हणून प्रसिद्ध असलेला यूट्यूबर (YouTuber) गौरव तनेजा (Gaurav Taneja) याला शनिवारी अटक करण्यात आली. नोएडा मेट्रो कोचमध्ये वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली. त्याच्या वाढदिवसादिवशी त्याची पत्नी रितू राठी तनेजा हिने चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी, नोएडा मेट्रोचा पूर्ण डबा बुक केला होता. हिरा स्वीट्सजवळील सेक्टर 51 नोएडा मेट्रो स्टेशनवर या वाढदिवसाचे सेलिब्रेशन झाले. या सेलिब्रेशननंतर तनेजाला कलम 188 चे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

गौरव तनेजाच्या वाढदिवसानिमित्त, त्याची पत्नी रितू राठी हिने सरप्राईज पार्टी आयोजित केली होती. तिने फ्लाइंग बीस्टच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर या सेलिब्रेशनचे तपशील शेअर केले होते आणि त्याच्या चाहत्यांना त्याचा वाढदिवस खास बनवण्याचे आवाहन केले होते. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रितूने त्याच्या चाहत्यांना सांगितले होते की, एनएमआरसीने दिलेल्या मेट्रोच्या कमाल क्षमतेनुसारच हे सेलिब्रेशन होणार आहे. आज दुपारी साधारण दीड वाजता हे सेलिब्रेशन झाले मात्र त्यानंतर लगेच, गर्दी जमवल्याबद्दल कलम 188 अंतर्गत गौरवला अटक करण्यात आली.

या वर्षाच्या सुरुवातीला नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (NMRC) लोकांना मेट्रो ट्रेनमध्ये वाढदिवस साजरा करण्याची परवानगी दिली. नोएडा मेट्रो ट्रेनमध्ये वाढदिवस पार्टी, लग्नाआधीचे शूट आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी लोक संपूर्ण डबा बुक करू शकतात. (हेही वाचा: मेट्रो स्टेशन वर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 40 वर्षीय व्यक्तीला अटक)

दरम्यान, गौरव तनेजा हा दिल्लीस्थित लोकप्रिय यूट्यूबर आहे. आज त्याचा 35 वा वाढदिवस आहे. तनेजाचे 3.3 दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्स आणि यूट्यूबवर वर 7.75 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. गौरव तनेजा, हा माजी व्यावसायिक पायलट असून, सध्या तो कॅम्पस लॉ सेंटर, लॉ फॅकल्टी, दिल्ली विद्यापीठ येथे कायद्याचे शिक्षण घेत आहेत.