हा कुठला न्याय! 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला 5 उठाबशा काढण्याची शिक्षा; Bihar मधील धक्कादायक घटना (Watch)
Representational Image (Photo Credits: File Image)

देशातील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा लागू आहे. इतकेच नाही तर महिलांकडे वाईट नजरेने पाहिल्यासही कठोर शिक्षा मिळेल, असाही कायदा आहे. मात्र बिहारमध्ये (Bihar) एका 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) करणाऱ्या आरोपीचे प्रकरण पोलीस ठाण्यातही पोहोचले नाही. आरोपीला चक्क उठाबशा काढायची शिक्षा देऊन पंचायतीनेच हे प्रकरण मिटवले. ही घटना बिहारमधील नवादा जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कन्नौज गावातील आहे. पंचायतीच्या या शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अकबरपूर ब्लॉकमधील कन्नौज येथील अरुण पंडितवर बलात्काराचा आरोप आहे. अरुण पंडित गावातच कोंबडी फार्म चालवतो. आरोपानुसार, 21 नोव्हेंबर रोजी आरोपीने गावातील एका 6 वर्षीय मुलीला फूस लावून आपल्या कोंबडी फार्ममध्ये नेले. याच ठिकाणी तिच्यासोबत बलात्काराची घटना घडली. घटनेनंतर या 6 वर्षीय मुलीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगितले.

मुलीचे वडील गावाबाहेर राहतात, परंतु ही माहिती मुलीच्या काकांना मिळताच त्यांनी पोलिसात तक्रार देण्यास सांगितले. या दरम्यान, आरोपीकडून पंचायतीला पाचारण करण्यात आले. एका माजी प्रमुखाच्या माध्यमातून आरोपीने पंचायतीला आपल्या बाजूने केले. त्यानंतर पंचायती बसल्यावर त्यांनी निर्लज्जपणे बलात्काराच्या आरोपीला सभेत उठाबशा काढण्याची क्षुल्लक शिक्षा दिली. (हेही वाचा: Karnataka Shocker: अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल बस चालक अटकेत)

या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी उठक बैठक काढताना दिसत आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पंचायतीने अशा जघन्य गुन्ह्यातील आरोपीला दोषमुक्त केले. पंचायतीच्या या कृत्यामुळे गावात संतापाचे वातावरण आहे. आरोपीने आपल्या शक्तीचा वापर करून पीडित पक्षावर आणि पंचायतीवर दबाव आणला आणि त्यांना पैसे देऊ केल्याची चर्चाही गावात आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनावर टीका होत आहे. एवढ्या मोठ्या घटनेची माहिती मिळूनही पोलीस दबावाखाली असल्याने, ते पोलीस ठाण्यातच राहिले. पोलिसांनी ना गावकऱ्यांची चौकशी केली, नाही वासनेचा बळी ठरलेल्या 6 वर्षीय निष्पाप मुलीचे जबाब घेतले. या प्रकरणात त्यांनी फक्त बघ्यांची भूमिका घेतली.