Droupadi Murmu (संग्रहित संपादित प्रतिमा)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांना राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला आमंत्रित केले नसल्याबाबत भाष्य केले होते. आता राहुल गांधींच्या या वक्तव्यावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय (Champat Rai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात काँग्रेस नेत्याने दिलेले वक्तव्य पूर्णपणे खोटे, निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे चंपत राय यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, 'राहुल गांधी यांनी गुजरातमधील एका सभेत म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्याने त्यांना अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. राहुल गांधींच्या या वाक्याला आमचा तीव्र आक्षेप आहे. हे असत्य, निराधार आणि दिशाभूल करणारे आहे.’

चंपत राय म्हणाले, 'आम्ही हे कळवू इच्छितो की भारताच्या आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांना अयोध्येत आयोजित शुभ समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय, गरीब, संत, अल्पसंख्याक गटातील लोक आणि भारताच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय मंदिराच्या बांधकामाशी संबंधित कामगारही अभिषेक सोहळ्यात उपस्थित होते.’ (बोन्हेही वाचा: Prayagraj (UP): प्रथमच अनुसूचित जातीच्या संताला देण्यात आली 'जगद्गुरू' ही पदवी)

पहा व्हिडिओ-

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस पुढे म्हणाले, 'भगवान रामाने आपल्या आयुष्यात कोणाशीही भेदभाव केला नाही. राम मंदिराच्या उभारणीत गुंतलेला ट्रस्टही कोणाशी भेदभाव करण्याचा विचार करू शकत नाही. वस्तुस्थितीची योग्य माहिती न घेता अशी चुकीची, निराधार आणि दिशाभूल करणारी भाषणे दिल्याने समाजात गंभीर मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याला आमचा तीव्र आक्षेप आहे. समाज जोडण्याचे काम आमचे आहे.’ चंपत राय म्हणाले की, राहुल गांधी यांनी 22 जानेवारीनंतर तीन महिन्यांनी हे वक्तव्य करणे म्हणजे समाजात भेदभाव करण्याचा प्रयत्न आहे.

दरम्यान, रामलल्लाच्या अभिषेकसाठी गांधी परिवार आणि काँग्रेस नेत्यांना श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आमंत्रित केले होते. ट्रस्टकडून इतर अनेक विरोधी नेत्यांनाही अभिषेकसाठी निमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यापैकी कोणीही आले नाही. हा भाजप आणि आरएसएसचा राजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत विरोधकांनी प्राणप्रतिष्ठेपासून स्वतःला दूर ठेवले.