Vyom Mitra (Photo Credits: Twitter)

ISRO's Robot Vyom Mitra To Go In The Space: इस्रो आपल्या नवीन अंतराळ मोहिमेवर सध्या काम करत आहे. गगनयान असे या नव्या मोहिमेचे नाव असून, इसरो आपल्या या मोहिमेत मानवांना अंतराळात पाठवणार आहे. परंतु, प्रत्यक्षात मानवांना अंतराळात पाठवण्यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था या वर्षाच्या अखेरीस एक ह्युमनॉइड रोबोट पाठवणार आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात मिशन गगनयानची घोषणा केली होती.

2022 मध्ये मानवांना अंतराळात पाठवण्यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्या ह्युमनॉइड रोबोटला पाठवण्याचा विचार करीत आहे त्याची पहिली झलक आता आपण पाहू शकतो. दरम्यान, मानवी मोहिमेत एकूण तीन जण असणार आहेत.

"व्योम मित्रा" म्हणून ओळखली जाणारी ही महिला रोबोट एकापेक्षा जास्त कार्ये करण्यास सक्षम आहे. तसेच ती दोन भाषांमध्ये बोलू शकते.

इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी गेल्या वर्षी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ह्युमनॉइड जवळजवळ तयार आहे. ते असेही म्हणाले की, “मानवांना पाठविण्या आणि त्यांना परत सुखरूप परत आणण्यापलीकडे, आम्हाला आमचं ध्येय सध्या होतंय हे आम्हाला सिद्ध करायचं आहे."

पुढे के सिवन म्हणाले की, वास्तविक मानव अंतराळ उड्डाण अभियानापूर्वी नियोजित करण्यात आलेल्या मानवरहित दोन्ही उड्डाणांमध्ये इस्रो मानवोइड पाठवत आहे. टीओआयच्या अहवालात के शिवन यांनी सांगितले आहे की, "आमचा रोबोट मनुष्यासारखा असेल आणि माणूस जे काही करू शकतो ते करण्यास सक्षम असेल, परंतु मनुष्यांइतकेच नाही."